धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल हा ड्रगजच असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने तपासणी अंती दिला आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात हा अहवाल सादर केला. कोर्टात 7 आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान हा अहवाल सादर केल्याने पोलीस व तपास यंत्रणेचा जीव भांड्यात पडत दिलासा मिळाला आहे. परंडा येथे जप्त ड्रग्ज हे कॅल्शियम क्लोराईड आढळले होते त्यानंतर तुळजापूर आरोपींच्या जामिनीवेळी इन्व्हेंटरी प्रमाणपत्रानुसार जप्त मुद्देमालाचे वजन हे शुन्य ग्रॅम असल्याचा मुद्दा ऍड अंगद पवार यांनी उपस्थितीत केला होता. त्यानंतर प्रयोगशाळेचा आलेला हा अहवाल कायदेशीरदृष्ट्या महत्वाचा ठरणार आहे.
तुळजापूर येथे राहणारे अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना पोलिसांनी तामलवाडी येथे 14 फेब्रुवारी 2025 रोजी अटक होती. त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांचे 45 ग्रॅम वजन असलेले 59 पुड्या एमडी अमली पदार्थ व गुन्ह्यात वापरलेले वाहन, मोबाईल असा 10 लाख 75 हजार रुपयांचा किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. पोलिसांनी जप्त मुद्देमाल पैकी काही सॅम्पल हे तपासणीसाठी पाठवले होते, त्यात अहवाल येत ड्रग्ज असल्याने आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे.
तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 36 जणांना आरोपी केले असुन त्यातील 14 आरोपी जेलमध्ये आहेत तर 22 आरोपी गेली दीड महिन्यापासुन फरार आहेत. 36 आरोपी पैकी 26 आरोपी हे ड्रग्ज तस्कर असल्याचे दाखवले असुन 10 आरोपी हे ड्रग्ज सेवन करणारे व्यसनी दाखवले आहेत. तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी कोर्टात 10 हजार 744 पानाचे चार्जशीट दोषारोपपत्र दाखल केले आहे.
अलोक काकासाहेब शिंदे, शाम विठ्ठलराव भोसले, संदीप भगवानराव टोले, जगदीश जीवनराव पाटील, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद रामकृष्ण जमधाडे, विशाल सुनील सोंजी, आबासाहेब गणराज पवार, अभिजीत अण्णासाहेब अमृतराव व दुर्गेश युवराज पवार यांनी ड्रग्ज विक्री करणाऱ्याकडुन ड्रग्ज विकत घेऊन सेवन करुन कलम 27 चे उल्लंघन केल्याने त्यानुसार दोषारोप ठेवण्यात आला आहे.
तुळजापूर ड्रग्ज तस्करीत मुंबई येथील तस्कर संगीता वैभव गोळे, वैभव अरविंद गोळे, संतोष अशोक खोत, जीवन नागनाथ साळुंखे, अमित अशोक आरगडे, युवराज देविदास दळवी, संदीप संजय राठोड, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, सयाजी शाहूराज चव्हाण, ऋतुराज सोमनाथ गाडे, सुमित सुरेश शिंदे, संकेत अनिल शिंदे, प्रसाद उर्फ गोटन कदम, राहुल सुनील कदम, गजानन उर्फ हंग्या प्रदीप हंगरगेकर, स्वराज उर्फ पिनू तेलंग, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे व संतोष उर्फ मेंबर देविदास कदम परमेश्वर, उदय उल्हासराव शेटे, अभिजित अनिल गव्हाड, विनायक विश्वासराव इंगळे, रणजीत रंगनाथ पाटील, अर्जुन हजारे, नाना कुऱ्हाडे, सुलतान उर्फ टिपू लतीफ शेख, इंद्रजीतसिंह उर्फ मिटू रणजितसिंग ठाकुर अश्या 26 आरोपीना ड्रग्ज तस्कर म्हणुन आरोपी करीत दोषारोप पत्र दाखल केले आहे. 26 आरोपीनी संगणमत करुन ड्रग्जची खरेदी विक्री, वाहतूक, साठवणूक केली, पैसे पुरविले तसेच त्याचा वापर व सेवन केले. ड्रग्ज तस्करीतुन बेकायदेशीर आर्थिक फायदा घेऊन अवैध संपत्ती कमावली असा ठपका ठेवण्यात आला असुन एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 8(क) 21(ब) 27, 27(क) 29, 68(सी) प्रमाणे दोष ठेवला आहे.
उपलब्ध व समोर आलेल्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीचे तस्करी करणारे पेडलर व सेवन करणारे असे 2 भागात वर्गीकरण केले असुन तपास सुरु असल्याने अधिकचे पुरावे मिळाल्यास किंवा समोर आल्यास सहभागी म्हणजे ठपका वाढू शकतो. भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 193(9) प्रमाणे पुरवणी दोषारोप पत्राची तजवीज राखून ठेवली आहे असे पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.