धाराशिव – समय सारथी
खताचा काळाबाजार धाराशिव येथील कृषी विभागाने उघड केला असुन 30 टन (598 बॅग) डीएपी व 20: :20:0 जप्त करून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, गुजरात येथील एका कंपनीचा परवाना निलंबित असताना देखील त्यांनी खत निर्मिती केले मात्र कृषी विभागाच्या सतर्कतेने हा काळाबाजार उघड झाला आहे.
जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांच्या पथकाने रंगेहात 8 लाखांचा खतसाठा वाहतूक होत असताना पकडला असुन आरोपीना अटक केली आहे. ही कारवाई तुळजापूर लातूर बायपास येथे करण्यात आली,तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांच्या सतर्कतेमुळे पाठलाग करुन ट्रक पकडण्यात आला त्यानंतर मुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या आदेशानुसार तात्या भालेराव हे तपास करीत आहेत.
गुजरात राज्यातील भावनगर येथील पृथ्वी खेतीवाडी केंद्र या कंपनीचा परवाना निलंबित केलेला असताना त्यांनी खत निर्मिती व विक्री केली. तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे हे तुळजापूर येथून जात असताना ट्रक क्रमांक एम एच 11 सीजे 3737 हा संशयास्पद दिसून आल्याने तो त्यांनी अडवला त्यानंतर खताची माहिती व पावती व इतर कागदपत्रे मागितली मात्र ती दिली नाहीत त्यामुळे त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांना हकीकत सांगत बोलावले तेव्हा हा काळाबाजार उघड झाला.
खत उत्पादन कंपनी नियंत्रण आदेश 1985, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 व भारतीय न्याय संहिता कलम 318, 336(2)(3) प्रमाणे आरोपी हनुमंत बोराडे, नेकनूर बीड, अविनाश बाळासाहेब दुबाले मुगगाव व पृथ्वी खेतीवाडी केंद्र कंपनीचा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी जयदीप भट्ट याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असुन अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.