नळदुर्ग – समय सारथी
तुळजापूर तालुक्यातील वडगाव देव येथे तब्बल 55 शेतकऱ्यांची 1 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असुन नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अशोक धुळाप्पा वाघमारे (वय 65 वर्षे, रा. वडगाव देव, ता. तुळजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी स्वप्नील सिद्राम रगबले, सुमित रगबले व खंडु उर्फ विजयकुमार तम्मा नामणे (तीघेही रा. अणदुर, ता. तुळजापूर) यांनी संगणमत करून “सोयाबीनला आमच्याकडे 4 हजार 700 रुपये प्रति क्विंटल भाव मिळेल. आमचा पुणे व औरंगाबाद येथील खरेदीदारांशी थेट संपर्क आहे,” असे आमिष दाखवले.
शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आपला माल दिला. त्यानुसार 60 टक्के रक्कम देण्यात आली व उर्वरित 40 टक्के रक्कम एक महिन्यात देण्याचे वचन आरोपींनी दिले. मात्र, त्यानंतर टाळाटाळ करत 1 कोटी 2 लाख 9 हजार 703 रुपये ही रक्कम न देता फसवणूक केली. कलम 316(2), 318(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, नळदुर्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.