धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील चित्रा ताई पाटील हत्याकांडातील आरोपी ओम निकम याला सोमवारपर्यंत 3 दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांना अधिकचा तपास करण्यासाठी ही कोठडी देण्यात आली आहे. या हत्याकांडात त्याचे आणखी कोणी साथीदार आहे का? त्याने नेमका खुन कोणत्या कारणासाठी केला याचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान ओम हा ऑनलाईन गेम, रमी व इतर माध्यमातुन आर्थिक संकटात आला होता, आर्थिक नुकसान झाल्याने त्याने सोन्याच्या मोहापोटी खुन केल्याची चर्चा रंगत आहे.
आरोपी ओम हा ‘शातीर’ असुन त्याने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी चित्रा ताई यांच्या अंगावर असलेले मिनी गंठण, हातातील अंगठी व एका कानातील कर्णफूल तसेच ठेवले, त्यामुळे त्याने हे केवळ सोने लुटीसाठी केले असे वाटू नये हा त्याचा हेतू असावा. पोलिसांनी तपासा दरम्यान ओमने लुटलेले जवळपास 11 तोळे सोने व चार चाकी गाडी जप्त केली आहे. त्याला सोने लुटण्याची गरज का पडली, त्याला सोन्याचा मोह का झाला यासह या हत्याकांडातील कारणांचा उलघडा पोलिस तपासात होणार आहे. सपोनि नामदेव मद्दे हे याचा तपास करीत आहेत, आरोपीच्या बाजुने ऍड अमोल वरुडकर हे बाजु मांडत आहेत.
चित्रा ताई यांनी ओमला पोटच्या मुलासारखे सांभाळले त्याच्या सुखदुःखात आईसारखा खंबीर आधार दिला त्यानेच विश्वासघात केला. लग्न जमल्याचा बहाणा करुन तो त्यांना घेऊन गेला व सोन्यासाठी त्याने आई समान चित्रा ताई यांचा निर्घृण खुन केला.
संग्राम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते व त्यांची आई एकत्र राहत होते, त्यांच्या आईच्या गळ्यात नेहमी दीड तोळ्याचे गंठण, पाटल्या असे 15 ते 16 तोळे सोने असायचे, त्या नेहमी ते सोने वापरत असत. शेजारील राहणारा 21 वर्षीय ओम निकम हा नेहमी घरी यायचा, त्याच्या लग्नाची व लग्न ठरल्याची बोलणी करायचा. 18 जुलै रोजी चित्रा ताई घरी नव्हत्या त्यावेळी त्यांच्या मुलाने घरी आल्यावर पत्नीस विचारले की, आई कुठे आहे तेव्हा त्या ओम निकम सोबत फोन आल्यावर कुठेतरी गेल्याचे सांगितले. त्या दिवशी रात्री उशीरा ओम निकम याला अनेक फोन केले मात्र त्याने आई सोबत नसल्याचे सांगितले त्यानंतर त्या बेपत्ता असल्याची तक्रार केली, पोलिसांनी तपास केल्यावर चित्रा ताईचा मृतदेह सापडला व त्यांच्या अंगावर काही दागिने नव्हते, ओम याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.