धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभेचा निकाल लागून जवळपास 2 महिने उलटून गेले असले तरी मतदान व मतमोजणीसाठी वापरले गेलेले ईव्हीएम, कंट्रोल युनिट, व्हीव्ही पॅट मशीन सिलबंद राहणार आहेत. या सर्व मशीन मतमोजणीनंतर स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आल्या असुन त्या सिलबंद आहेत. या स्ट्रॉंगरूमच्या बाहेर पोलिसांचा 24 तास खडा पहारा सुरु आहे. निवडणुक निकालानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात निवडणुक याचिका दाखल केल्याने आगामी काही महिने हे सील कायम असणार आहे.
धाराशिव लोकसभेतील धाराशिव, तुळजापूर, भुम, उमरगा, औसा व बार्शी या 6 विधानसभा मतदार संघातील मशीन ह्या शासकीय तंत्रनिकेतन येथील स्ट्रॉंगरूममध्ये सिलबंद करुन ठेवण्यात आल्या आहेत. 2 हजार 139 मतदान केंद्रातील जवळपास 6 हजार 500 मशीन इथे असुन त्याच्या सुरक्षेसाठी सिसीटीव्ही व पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने त्यावर कोर्टाचा पुढील आदेश येईपर्यंत या मशीन सीलबंद असणार आहेत. निवडणुक विभागाने याबाबत पोलिसांना कळविले असुन पोलिसांचा सशस्त्र पहारा इथे असणार आहे. मशीन सांभाळणे व सुरक्षा देणे हे प्रशासनासाठी एक प्रकारे डोकेदुखीचे ठरत असुन यामुळे यंत्रणा काही महिने गुंतून राहणार आहे.