धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची सोय व्हावी यासाठी तुळजापूर नगर परिषदेने यात्रा मैदानासाठी सर्वे नंबर 138 मधील 2 हेक्टर 63 आर इतकी जमीन संपादीत केली मात्र ती जागा हडप केल्याचे व विक्री केल्याचे चौकशी अहवालातुन समोर आले आहे. यात्रा मैदान हडप केल्याची तक्रार केल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी 5 सदस्य असलेली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने सुनावणी घेऊन दिलेल्या स्वयंस्पष्ट चौकशी अहवालात अनेक गंभीर प्रकार समोर आले असुन समितीने कारवाईची शिफारस केली आहे.
समितीने अहवाल सादर करून जवळपास 3 महिन्याचा कालावधी उलटला असला तरी कोणतीही कारवाई करण्यात आली नसून हा अहवाल दडवला जात असल्याचा आरोप होत आहे. काही जणांच्या राजकीय दबावामुळे हा अहवाल लाल फितीच्या कारभारात अडकवला आहे. मैदान जागा हडप केल्याने अनेक अडचणी येत असुन गेली 3 दशकापासून यावर कोणीही बोलायला व कारवाई करायला तयार नाही. 27 वर्षापुर्वीच्या या प्रकाराला अहवालामुळे वाचा फुटली आहे.
तुळजापूर येथील यात्रा मैदान जागा हडप केल्याची तक्रार संभाजी शिवाजीराव नेप्ते व किरण माणिकराव यादव यांनी केली होती, त्यानुसार तहसीलदार अरविंद बोळंगे अध्यक्ष, नगर परिषद मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार सचिव व सदस्य पोलिस निरीक्षक राजीव खांडेकर, मंडळ अधिकारी अमर गांधले, तलाठी अशोक भातभागे या 5 जणांची समिती 6 ऑगस्ट 24 रोजी गठीत करण्यात आली. या समितीने सुनावणी घेऊन अहवाल सादर केला असुन त्यात अनेक धक्कादायक बाबी नोंद केल्या आहेत. शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अमोल शिवाजीराव जाधव यांनी देखील आवाज उठवत कारवाईसाठी पाठपुरावा सुरु केला आहे.
माजी उपनगराध्यक्ष पंडीत जगदाळे, हरिश्चंद्र जगदाळे, गंगाधर चव्हाण यांच्यासह 27 जणांवर बनावट दस्ताऐवज, खोटे निवेदन व शपथपत्र, शासनाचे आर्थिक नुकसान, दिशाभुल व फसवणुक केल्याचा ठपका ठेवला असुन फौजदारी गुन्हा नोंद करण्याची शिफारस केली आहे. यात्रा मैदान जागा हडप करून त्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम, पत्र्याचे गाळे अर्थात अतिक्रमण काढून टाकून जागा पुनःश्च शासनाच्या ताब्यात घेणे, 27 जणांकडुन शासनाच्या नुकसान भरपाईपोटी 39 कोटी वसुल करणे, सदर वसुलीसाठी त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून बँक खाती गोठवणे, या जागेच्या बाबतीत केलेली सर्व खरेदी खत रद्द करणे व त्यासाठी दिवाणी न्यायालयात शासकीय अभियोकता यांच्या मार्फत दावा दाखल करणे, तक्रारदार नेप्ते व यादव यांना मानसिक व आर्थिक त्रासापोटी 1 लाख नुकसान भरपाई देण्याची शिफारस या अहवालात केली आहे.
चौकशी समितीने समोर आलेल्या सर्व उपलब्ध कागदपत्रे आधारे, नगर परिषद, नगर रचनाकार, भुमी अभिलेख कार्यालयासह अन्य विभागानी सादर केलेली कागदपत्रे व पुरावे, तक्रारदार व गैरअर्जदार या दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून त्यांचा कारवाईचा स्वयंस्पष्ट अहवाल उपविभागीय अधिकारी यांना सादर केला आहे. हा अहवाल सादर करून जवळपास 3 ते 4 महिने होत आले मात्र कोणतीही अंमलबजावणी अथवा कारवाई करण्यात आलेली नाही.