धाराशिव – समय सारथी
धाराशिव येडशी येथील मुकुंद माधव कसबे या तरुणाच्या मृत्यु प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी एक तपास अहवाल केला होता त्यात अनेक धक्कादायक खुलासे व काही अधिकारी दोषी असल्याचे नमुद केले होते मात्र तो अहवाल सोयीस्करपणे दडपला गेला आहे. या अहवालात ग्रामीण पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक मारुती शेळके यांनी गंभीर चुका केल्याचे कागदोपत्री पुराव्यासह नमुद असुन त्यात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. कसबेचा मृत्यू हा अपघात दाखवून हे प्रकरण दडपले जात आहे, यात ग्रामीण पोलिस ठाण्यातील काही अधिकारी व दलाल यात गुंतले आहेत. या अहवालावर पोलिस अधीक्षक रितु खोखर काय भुमिका घेणार हे पाहावे लागेल, या अहवालात मृत्युंच कोडं सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
21 मार्च 2024 रोजी येडशी येथील हॉटेल कालिका ढाबा येथे वेटर मुकुंद माधव कसबे (रा मोहा, ता कळंब) हा काम करीत होता. काम करीत असताना ढाब्यासमोर सिमेंट काँक्रेटवर पडून कानातुन रक्त आल्याने त्यास रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले व 23 मार्चला त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला अशी तक्रार राहुल बाळासाहेब देशमुख यांनी दिली त्यावरून धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची मयत क्रमांक 17/24 सीआरपीसी कलम 174 प्रमाणे नोंद घेण्यात आली. त्यावेळी कोणावरही संशय तक्रार नसल्याचा जबाब देशमुख यांनी दिला, या गुन्ह्याचा तपास करुन पोलिस निरीक्षक शेळके यांनी अंतीम अहवाल मंजुरीसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना पाठवला, तो नाकारत राठोड यांनी काही प्रश्न निर्माण केले आहेत.
अंतीम अहवाल मंजुरीसाठी आल्यानंतर तपासात अनेक गंभीर चुका असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी राठोड यांच्या लक्षात आले, त्यानंतर त्यांनी त्रुटीचे पत्र ग्रामीण पोलीसांना पाठवले व त्यावर स्पष्टीकरण मागवले. वैद्यकीय उपचार कागदपत्रे, पोस्ट मार्टेम अहवाल, साक्षीदार यांचे जबाबाची सत्यता त्यांनी पडताळून पाहण्यासाठी कागदपत्रे मागवली त्यात अनेक बाबी समोर आल्या. कसबे यांच्या उजवा व डावा हात, खांद्यावर, पिंडरीवर मारहाण झाल्याच्या जखमा होत्या व अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने डोळ्यात रक्त होते, वैद्यकीय उपचाराचे पान नंबर 6 तपास अधिकारी यांनी गायब केले होते, ते जिल्हा रुग्णालयात सापडले असुन त्यात कसबे यांनी मारहाण झाल्याचे सांगितले आहे.
शेळके व इतर अधिकारी यांनी जाणीवपूर्वक काही कागदपत्रे वगळून तपास केला. वैद्यकीय उपचाराच्या कागदपत्रामधील 6 पाने समोर येऊ दिली नाहीत. साक्षीदार गणेश कदम याचा जबाब घेण्यात आला की त्यांचे वडील नवनाथ कदम हे सरकारी रुग्णालयात गुडघेदुखीवर उपचार करायला 8 दिवसापासुन ऍडमिट होते व त्यांना पहायला आल्यावर कळले की कसबे रुग्णालयात ऍडमिट आहे व त्यांचा मृत्यू झाला, कोणावर संशय नाही. कदम यांचे वडील रुग्णालयात ऍडमिट होते की नाही याची माहिती राठोड यांनी मागितल्यावर कदम हे ऍडमिट नसल्याचे सत्य समोर आले, कदम यांचा खोटारडे पणा व जबाब समोर आल्याने संशय वाढला आहे.
उपविभागीय अधिकारी राठोड यांच्या अहवालात अनेक गंभीर बाबी नमुद केल्या असुन त्यात कारवाईची शिफारस केली आहे. कसबे यांना मारहाणीत झाल्याचे ते स्वतः उपचारासाठी गेल्यावर सांगतात तश्या नोंदी वैद्यकीय अधिकारी यांनी केसपेपरवर घेतल्या आहेत, त्यामुळे तसा गुन्हा नोंद करुन तपास होणे गरजेचे आहे. यात काही जणांनी आर्थिक व्यवहार करुन हे प्रकरण दडपले आहे त्यामुळे याच्या तपासासाठी विशेष पथक नेमणे गरजेचे आहे. देशमुख यांना घटनेच्या तब्बल 1 वर्ष 3 महिन्यांनी साक्षात्कार झाला व 2 जुन 2025 रोजी फिर्याद दिली की ढोकी येथील धनराज किसन कांबळे यांचेकडुन माहिती की कसबेला मोटारसायकलने धडक दिली.