महसुल, पोलीस व प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला पंचनामा, गावकऱ्यांनी मांडल्या व्यथा
धाराशिव – समय सारथी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील दारू उत्पादन करणाऱ्या ऍडलर्स कंपनीच्या दुषित पाणी व इतर तक्रारीबाबत चौकशी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव यांनी 5 जणांची चौकशी समिती गठीत केली होती, या समितीने कारखाना परिसर, तलाव व इतर भागाची संयुक्त पाहणी करुन पंचनामा केला. या कंपनीकडुन होत असेल्या जल व वायू प्रदूषण बाबत शेतकरी, गावकरी यांनी व्यथा मांडल्या, पथकाने पंचनामा केला असुन आता त्यांच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.
कळंब उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीत कळंब तहसीलदार, पोलिस निरीक्षक, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व संभाजीनगर येथील प्रदूषण नियंत्रण अधिकारी यांचा समावेश या पथकात आहे. या समितीने कंपनीच्या ठिकाणी जाऊन संयुक्त पाहणी केली त्याचा अहवाल सादर केल्यानंतर पुढील दिशा ठरणार आहे. आमदार कैलास पाटील यांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घातले असुन गावकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल पाठपुरावा सुरु केला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील दारू उत्पादन करणाऱ्या ऍडलर्स कंपनीला महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापुर्वीच दणका दिला आहे. ऍडलर्स कंपनीमुळे या भागात प्रदूषण होत असल्याचा चौकशी अहवाल लातूर कार्यालयाने दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागीय अधिकारी मनीष होळकर यांनी या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कंपनी जाणीवपूर्वक प्रदूषण करीत असल्याचा ठपका ठेवला असुन कंपनीची परवानगी रद्द करुन ती बंद का करण्यात येऊ नये ? कंपनीचा वीज व पाणीपुरवठा का खंडित करण्यात येऊ नये अशी नोटीस बजावली आहे.
काळ्या पाण्याची शिक्षा, गौरगाव विस्थापित होण्याची वेळ – दुषीत पाण्याने आरोग्य धोक्यात, कारखान्याकडुन नियम धाब्यावर या मथळ्याखाली दैनिक समय सारथी वृत्तपत्राने बातमी प्रसिद्ध केली होती. गौरगाव येथील शाम कापसे व अक्षय वाघ या दोघांनी पाणी व हवा प्रदूषण होत असल्याची लेखी तक्रार दिली होती त्यानंतर ऍडलर्स कंपनीच्या दुषित पाणी व इतर तक्रारीबाबत चौकशी करण्यासाठी लातूर येथील पथक आले होते त्या पथकाने पाहणी करुन पंचनामा केला होता त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. ड्रायर सेक्शन मधील इस्ट स्लज सोबत पावसाचे पाणी मिक्स होऊन बंधाऱ्यात गेले, नैसर्गिक नाल्यात काळे पाणी झाले असुन ते पाझर तलावात जात आहे. या पाण्याला विशिष्ट प्रकारचा वास होता असे नमूद करुन कारखाना व जवळील भागातील 6 ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.