धाराशिव – समय सारथी
केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेंतर्गत (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेत मास कॉपी झाल्याचा आरोप करण्यात आला होता या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांनी 5 जणांची चौकशी समिती गठीत केली असुन 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांची चौकशी समिती गठीत केले आहे. केंद्रातील सीसीटीव्ही व परीक्षा पेपर पुन्हा तपासले जाणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील 191 विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षात पास झाले त्यातील एकट्या लोहारा तालुक्यातील व 8214 या केंद्रावरील 115 विद्यार्थी आहेत. याची पोलखोल दैनिक समय सारथीने केल्यानंतर चौकशी समिती गठीत केली आहे. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी प्राथमिक शिक्षक महासंघांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे व आदित्य क्लासेसचे आदित्य लोमटे यांनी केली होती.
लोहारा येथे एकाच परीक्षा केंद्रावर 271 विद्यार्थी यांनी परीक्षा दिली त्यात 115 म्हणजे एका केंद्रावर 42 टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षाला पात्र ठरले तर संपुर्ण जिल्ह्यात 6 हजार 264 विद्यार्थी यांनी परीक्षा दिली त्यातील केवळ 90 विद्यार्थी म्हणजे केवळ 1.43 टक्के विद्यार्थी पास झाले.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा, यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ‘एनएमएमएस’ परीक्षा घेतली जाते. आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थीना पुढील चार वर्षे प्रत्येकी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते, त्यामुळे आर्थिक फायदा मिळावा यासाठी मास कॉपी केल्याचा आरोप होत आहे. भुम तालुका 14, कळंब 16, लोहारा 115, उमरगा 2, धाराशिव 27, परंडा वाशी प्रत्येकी 3 व तुळजापूर तालुक्यातील 11 विद्यार्थी यात पात्र ठरले.
लोहारा तालुक्यातील 8214 या क्रमांकाच्या केंद्रातील बहुतांशी विद्यार्थ्यांना पेपर क्रमांक दोनमध्ये एकसमान गुण आहेत. गणितामध्ये 87 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 18 गुण मिळाले आहेत. दुसऱ्या पेपरला एक-दोन नव्हे, तर तब्बल 77 विद्यार्थ्यांनी 90 पैकी 70 ते 75 दरम्यान गुण घेतले आहेत. तर 87 विद्यार्थी असे आहेत, ज्यांना गणितामध्ये प्रत्येकी 18 गुण मिळाले आहेत. सायन्समध्येही (विज्ञान) काही वेगळे चित्र नाही. 56 विद्यार्थ्यांनी एकसारखे प्रत्येकी 30 गुण घेतले आहेत, तर 16 विद्यार्थी असे आहेत, ज्यांना प्रत्येकी 29 गुण मिळाले आहेत. गुणांचा हा सर्व खेळ पाहता सगळं संशयास्पद आहे.