धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळाची स्तिथी गंभीर असुन याबाबतचा लेखी अहवाल लवकर केंद्र सरकारला देणार असल्याची माहिती दुष्काळ पाहणी पथकातील सदस्य यांनी प्रसार माध्यमाशी चर्चा करताना दिली. केंद्र सरकारचे दुष्काळ पाहणी पथक शेतकऱ्यांच्या बांधावरजात असुन शेतकरी यांच्याशी संवाद साधत आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यासह महसूल, कृषी विभागाचे अधिकारी यांनी पथकाला माहिती दिली.
अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे, गणेश पवार, जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने, तहसीलदार शिवानंद बिडवे हे उपस्थितीत होते.
धाराशिव, लोहारा व वाशी या 3 दुष्काळग्रस्त तालुक्याची पाहणी सुरु असुन पीक, चारा व पाणी टंचाई मोठी आहे. पथक शेतकरी यांच्याशी चर्चा करुन माहिती, स्तिथी व व्यथा ऐकून घेत आहे.
केंद्राचे पथकाने सकाळच्या सत्रात धाराशिव तालुक्यातील ताकविकी, करजखेडा व लोहारा तालुक्यातील मार्डी, लोहारा, मालेगाव, धानोरी, तावशीगड येथे पाहणी केली असुन आता दुपारी धाराशिव येथे आढावा बैठक घेतील त्यानंतर वाशी तालुक्यातील बोरी, वाशी, विजोरा या गावांची पाहणी करतील.
धाराशिव जिल्ह्यात 30 दिवस पुरेल इतकाच 1 लाख 5 हजार 41 मीटर चारा उपलब्ध आहे. लहान व मोठ्या जनावरांची संख्या पाहता दररोज 3 हजार 089 टन चारा आवश्यक आहे. पुढील चारा टंचाई रोखण्यासाठी धाराशिव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे टंचाई आराखडा दिला असून त्या टंचाई आराखड्याला तात्काळ मान्यता देऊन निधी उपलब्ध करून चाऱ्याची सोय करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
167 चारा छावण्यासाठी 1 हजार 204 कोटी तर 191 टँकरसह पाण्यासाठी 14 कोटी लागु शकतात. ही आकडेवारी प्राथमिक असली तरी यात वाढ होऊ शकते. आर्थिक तरतुदीबरोबरच चारा वाहतुक बंदीसह अन्य बाबींची उपाययोजना सुद्धा केली आहे. धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवले असुन सिंचन शेती वापरावर बंदी केली आहे.