धाराशिव – समय सारथी
दुष्काळ पाहणीसाठी केंद्र सरकारचे पाहणी पथक महाराष्ट्रात येणार असुन केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी असलेल्या 4 टीम पाहणी करणार आहेत. 13 व 14 डिसेंबर रोजी धाराशिव व बीड जिल्ह्यासह 8 जिल्ह्याचा दुष्काळ पाहणी व आढावा बैठक दौरा करणार आहेत.
पथक 1 हे छत्रपती संभाजीनगर व जालना, पथक 2 बीड व धाराशिव, पथक 3 पुणे सोलापूर तर पथक 4 नाशिक व जळगाव येथील पाहणी करणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, लोहारा व वाशी या 3 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असुन तिथे पाहणी करणार आहेत. पीक स्तिथी, पिण्याचे पाणी टंचाई याची पाहणी करुन केंद्र सरकारला अहवाल देणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली.
केंद्रीय पथक 12 डिसेंबर रोजी पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात कृषी आयुक्त व महसूल विभागीय आयुक्त यांची बैठक घेणार असुन त्यानंतर 4 वेगवेगळ्या टीम पाहणी करणार आहेत. पाहणीनंतर पुन्हा एकदा पुणे येथे सर्व अधिकारी यांची आढावा बैठक होणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात 34 दिवस पुरेल इतकाच 1 लाख 5 हजार 41 मीटर चारा उपलब्ध आहे.धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये एक लाख 5 हजार 41 मीटर चारा उपलब्ध असल्याचे समोर आले असून जिल्ह्यात फक्त 34 दिवस पुरेल एवढाच चारा उपलब्ध असल्याचं समोर आले आहे.लहान व मोठ्या जनावरांची संख्या पाहता दररोज 3 हजार 089 टन चारा आवश्यक आहे.पुढील चारा टंचाई रोखण्यासाठी धाराशिव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे टंचाई आराखडा दिला असून त्या टंचाई आराखड्याला तात्काळ मान्यता देऊन निधी उपलब्ध करून चाऱ्याची सोय करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
डिसेंबर महिन्यानंतर पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाई भासू शकते त्यामुळे जिल्ह्यात 167 चारा छावण्यासाठी 1 हजार 204 कोटी तर 191 टँकरसह पाण्यासाठी 14 कोटी लागु शकतात. ही आकडेवारी प्राथमिक असली तरी यात वाढ होऊ शकते. आर्थिक तरतुदीबरोबरच चारा वाहतुक बंदीसह अन्य बाबींची उपाययोजना सुद्धा केली आहे. धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवले असुन शेती वापरावर बंदी केली आहे.