धाराव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे पोलिसांना 3 वेळेस ड्रग्ज सापडले, त्यातील पहिली कारवाई तामलवाडी तर दुसऱ्या 2 तुळजापूर येथे करण्यात आल्या. तामलवाडी हे ड्रग्ज तस्करांसाठी प्रवेशद्वार असल्याचे यातून समोर आले आहे. अवैध धंदे ते ड्रग्ज तस्करी या भागातून होत असुन त्याला या भागातील अण्णा व सुनील नावाच्या एका दलालाकडुन खतपाणी दिले जाते व तोडपाणी करण्यात याचा हात असल्याचे बोलले जात आहे. ही जोडी इथल्या पोलिसांवर भारी झाली असुन शिरजोरी करत आहे. ही जोडी ड्रग्ज तस्कर यांच्या संपर्कात असल्याचा संशय असुन त्याचा तपास करण्याची मागणी होत आहे. ड्रग्ज प्रकरणात ‘तोडपाणी’ करण्यासाठी जोडीची सवयी प्रमाणे चुळबुळ सुरु आहे.
तामलवाडी येथे लाचलुचपत विभागाने कारवाई करीत सहायक पोलिस निरीक्षक देवकर यांना गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी 1 लाख रुपये लाचेची मागणी करुन 50 हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली त्यात सुनीलचे नाव समोर आले होते, एसीबीने त्याचा जबाब सुद्धा घेतला होता. या जोडीचे सीडीआर, फोन तपासल्यास अनेक अवैध धंदे व बाबी समोर येतील.
तामलवाडी येथील ‘अण्णा’ ची पोलिसांच्या पथकावर करडी नजर असल्याचे समोर आले, पोलिस पिंटू मुळे याला तपासासाठी सराटी येथे घेऊन जात असताना हा ‘अण्णा’ हा ‘प्रतिष्ठान’ लिहलेल्या एका गाडीतून पोलिस पथकाच्या मागावर होता व पाठलाग करीत होता. पोलीस अधिकारी यांनी याला चांगलेच सुनावल्याचे समजते मात्र या हस्तक्षेप व पाठलागाची नोंद पोलिस डायरीत घेऊन तपास होणार का? हे पाहावे लागेल.
तुळजापूर तालुक्याच्या नेतृत्वाने या ‘अण्णा’ ला तामलवाडी भागाची, पोलिस ठाणे व इतर कामांची ‘पाटील’की दिली आहे. तामलवाडी इथल्या एका अधिकाऱ्याला या अण्णाने नेतृत्वाच्या गाडीत बसवून त्याचे कसे ऐकायचे यासाठी दबाव टाकला व नेत्याने पण उपदेशाचे डोस दिल्याची चर्चा आहे.अण्णाच्या अवैध कर्तृत्वाचा लोंढा एक दिवस नेतृत्वापर्यंत जाऊ नये म्हणजे झाले. अण्णा इथला आका बनला आहे.
पोलिस अधीक्षक संजय जाधव व तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत त्यामुळे पोलिसांना अपेक्षित यश मिळत आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे दिवसरात्र एक करुन तपास करीत आहेत.