धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मुख्य म्होरक्या विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला पोलिसांनी अटक केली असुन धाराशिव येथील न्यायालयाने त्याला 13 मार्चपर्यंत 14 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस या घटनेचा तपास करीत असताना तामलवाडी येथील एका ‘अण्णा’ ची पोलिसांच्या पथकावर करडी नजर आहे. पोलिस मुळे याला तपासासाठी सराटी येथे घेऊन जात असताना हा ‘अण्णा’ ‘प्रतिष्ठान’ लिहलेल्या एका गाडीतून पोलिस पथकाच्या मागावर होता व पाठलाग करीत होता. मुळे व या अण्णाचे संबंध असुन अवैध धंद्याचे व तोडपाणीचे लागेबांधे आहेत. ड्रग्ज तस्करीत हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्याच्या नेतृत्वाने या ‘अण्णा’ ला तामलवाडी भागाची, पोलिस ठाणे व इतर कामांची ‘पाटील’की दिली आहे. पाठलाग करीत असलेली बाब सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असल्याचे कळते. हा पाठलाग पोलिस तपासात हस्तक्षेप होता की दबावतंत्र याची चर्चा सुरु झाली आहे. मुळे याच्या संपर्कात हा अण्णा नेहमी असल्याने पोलिस या पाठलाग व अन्य बाबींचा तपास करणार का हे पाहावे लागेल. अण्णाच्या अवैध कर्तृत्वाचा लोंढा नेतृत्वापर्यंत जाऊ नये म्हणजे झाले.
मुंबईतील ड्रग्ज तस्कर संगीता गोळे व तीचा पती वैभवकडुन तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे हा गेली 3 वर्षांपासुन ड्रग्ज मुंबईतुन आणत तुळजापूर येथे विकत होता. संगीता गोळे, तिचा पती वैभव व दीर अभिनव याच्यावर अंमली पदार्थ तस्करीचे अनेक गुन्हे नोंद आहेत, हे सगळे कुटुंब ड्रग्ज तस्करीत सहभागी आहे. वैभव गोळे याच्यावर अंमली पदार्थ तस्करीचे 2 व शासकीय कामात अडथळा व कर्मचारी याला मारहाण केल्याचा एक गुन्हा नोंद आहे, तो तुळजापूर पोलिसांना वॉन्टेड असुन फरार आहे.
तुळजापूरला पिंटू मुळे याने सर्वप्रथम ड्रग्ज विक्री करायला सुरुवात केल्याची कबुली आरोपी संगीता व संतोष खोत याने दिली आहे. एकेकाळी कर्जबाजारी असलेला मुळे हा ड्रग्ज तस्करीत करोडपती झाला असुन पोलिस त्याच्या व संगीताच्या बँक खाते, संपत्तीचा शोध घेत आहेत. गेली 2-3 वर्षांपासुनचे आर्थिक व्यवहार व कॉल रडारवर असुन तांत्रिक विश्लेषण सुरु आहे. मुळेला माल खरेदीसाठी पैसे कोण दिले, त्याने किती लोकांना ड्रग्ज विकले, डीलर कोण, या रॅकेटचा फायनासर कोण, कोणाला आर्थिक लाभ झाला याचा तपास सुरु आहे.