धाराशिव – समय सारथी
ड्रग्ज प्रकरणी तुळजापूर एकत्र झाले असुन सर्व पक्ष, व्यापारी, पुजारी व नागरिक यांच्या वतीने तुळजापूर येथे आज 15 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता जनहित संघटना कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ड्रग्ज प्रकरणात 16 आरोपी असुन त्यातील 6 जण जेलमध्ये आहेत, 4 जण पोलिस कोठडीत तर 2 जण फरार व 4 नावे गोपनीय आहेत. ड्रग्ज तस्करीचा ‘आका’ व ‘बोका’ कोण हे अद्याप समोर आले नसुन त्यांना अटक करा अशी तुळजापूर यांची मागणी असुन पोलिसांनी गोपनीय नावे ठेवलेले ते 4 आरोपी कोण ? त्यांना अटक कधी करणार ? हा प्रश्न आहे. या बैठकीत आजवर झालेल्या कारवाईवर चर्चा होणार असुन ड्रग्ज प्रकरणात पुढील आंदोलन स्वरूप व दिशा यावर चर्चा व निर्णय होणार आहे. ‘आका’ व बोकाने तरुण पिढीला पोखरून टाकले आहे आणि हे जेलमध्ये जाईपर्यंत ही लढाई सुरू आहे तरी तुळजापुरातल्या सुज्ञ नागरिकांनी सायंकाळी सहा वाजता बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. ड्रग्जमुळे पालक धास्तावले असुन भावी पिढी विषयी चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.