फायनान्सर कोण ? बँक खाते गोठवुन संपत्ती जप्त करण्याची मागणी – आर्थिक नाड्या आवळा
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मुंबई येथील तस्कर संगीता गोळे व तिचा पती वैभव याच्या संपर्कात विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे हा गेली 3 वर्षांपासुन असल्याचे निष्पन्न झाले असुन तसे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. संगीता व पिंटूच्या जोडीने तुळजापूरला ड्रग्जची गोळी दिली असुन ड्रग्ज विक्रीतून या दोघांनी करोडो रुपयांची संपत्ती कमावली आहे. तुळजापूरला पिंटू मुळे याने सर्वप्रथम ड्रग्ज विक्री करायला सुरुवात केल्याची कबुली आरोपी संगीता व संतोष खोत याने दिली आहे. एकेकाळी कर्जबाजारी असलेला मुळे हा ड्रग्ज तस्करीत करोडपती झाला असुन पोलिस त्याच्या व संगीताच्या बँक खाते, संपत्तीचा शोध घेत आहेत. गेली 3 वर्षांपासुनचे आर्थिक व्यवहार व कॉल रडारवर असुन तांत्रिक विश्लेषण सुरु आहे. मुळेला माल खरेदीसाठी पैसे कोण दिले, त्याने किती लोकांना ड्रग्ज विकले, डीलर कोण, या रॅकेटचा फायनासर कोण, कोणाला आर्थिक लाभ झाला याचा तपास सुरु आहे. बँक खाते गोठवून संपत्ती जप्त करा अशी मागणी होत असुन पोलिस आरोपीच्या आर्थिक नाड्या शोधून त्या आवळणार आहेत. संगीता जेलमध्ये आहे तर पिंटू पोलिस कोठडीत तर वैभव फरार आहे. हे ‘त्रिकुट’ पोलिसांच्या रडारवर आहे, तिघांची बँक खाती, कॉल रेकॉर्ड तपासले जात आहे.
संगीता हिच्या बँक खात्यावर तब्बल 5 कोटी पेक्षा अधिक बँक व्यवहार पोलीस तपासात सापडले असुन ड्रग्ज तस्करीतुन मिळालेले पैसे तिने सोने, म्युचवल फंड व मुंबई येथे स्थावर मालमत्ता विकत घेतल्याचे समोर आले आहे. संगीता हिचे सोलापूरसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील लोकांशी संपर्क असल्याचे निष्पन्न झाले आहे. तस्कर संगीता हिच्या बँक खात्यात करोडो रुपये असुन त्याचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत, त्यातून काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. अनेक लोकांची कुटुंब उध्वस्त करीत या महिलेने व पिंटू मुळेने करोडो रुपयांची मालमत्ता कमावली आहे, ही मालमत्ता जप्तीची कारवाई पोलीस करणार का ? हे पाहावे लागेल.
तस्कर संगीता गोळे व तीच्या पतीकडुन तुळजापूर येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे हा गेली 3 वर्षांपासुन ड्रग्ज मुंबईतुन आणत तुळजापूर येथे विकत होता. संगीता गोळे, तिचा पती वैभव व दीर अभिनव याच्यावर अंमली पदार्थ तस्करीचे अनेक गुन्हे नोंद आहेत, हे सगळे कुटुंब ड्रग्ज तस्करीत सहभागी आहे. वैभव गोळे याच्यावर अंमली पदार्थ तस्करीचे 2 व शासकीय कामात अडथळा व कर्मचारी याला मारहाण केल्याचा एक गुन्हा नोंद आहे, तो तुळजापूर पोलिसांना वॉन्टेड असुन फरार आहे.
विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे हा ड्रग्ज तस्करीचा एक मोठा दुवा असुन त्याने तुळजापूर येथील अनेकांना ड्रग्जच्या सेवनाला नादी लावले आहे, गेल्या 3-4 वर्षापुर्वी त्याने तुळजापूरमधील काही नेत्यांना ड्रग्जची ओळख करुन दिली, ड्रग्जची नशा चढल्याने काही जण व्यसनाच्या आहरी गेले. सुरुवातीला काँग्रेसमध्ये असलेला व नंतर भाजपात जाऊन पंचायत समितीत सत्ता परिवर्तन करण्यात मुळेचा मोठा हात होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मुळेने राजकीय स्तिथीचा फायदा घेत ड्रग्जचा व्यवसाय चांगलाच थाटला मात्र तो अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ड्रग्ज सिंडीकेटचा ‘आका’ व त्या ‘आका’ ला पाठबळ देणारा ‘बोका’ उघड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
माझ्या टीपमुळेच कारवाई – मग हे ड्रग्जचे पाप कोणाचे ? एकाला व्यसनमुक्ती केंद्रात, पत्रकारांना दिली होती कबुली
माझ्या टीपमुळेच पोलिसांनी कारवाई केली असा आमदार पाटील यांचा दावा आहे, पिंटू मुळे हा त्यांच्यामुळे पकडला गेला असेच म्हणाले लागेल. आमदार पाटील यांच्या काळात तुळजापूर येथे ड्रग्ज तस्करीचा धंदा रुजला व वाढला हे सत्य आहे. त्यांना अनेक नागरिक, पत्रकार यांनी समक्ष भेटून कल्पना दिली, त्यांनी काही बाबी मान्य केल्या. मला याची कल्पना आहे, मी एका नेत्याला गुजरातला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवून सुधारले आहे. एक चुक दुरुस्त केली आहे, आपण सर्व व्यवस्थित करू असे आश्वासन त्यांनी पत्रकार यांच्याशी बोलताना दिले. मात्र नंतर 2 वर्ष कानाडोळा केला असा तुळजापुरकरांचा आरोप आहे. तरुण पिढी बरबाद होत असल्याने हे पाप कोणाचे हा प्रश्न नागरिकांतुन विचारला जात आहे. लोकप्रतिनिधी असलेल्या आमदार पाटील यांची राजकीय हतबलता, मजबुरी काय आहे हा प्रश्न तुळजापूरकर विचारत आहेत. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सोबत सावलीसारखे वावरणारे व राजकारणात वोट बँकचे मूल्य असलेले काही नेते व्यसनात व तस्करीत गुंतले आहेत हे मुळे याच्या अटकेने स्पष्ट झाले आहे, भाजपने मुळे याचा काही संबंध नाही, तो भाजपचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता नाही असे स्पष्टीकरण जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी दिले आहे मात्र आमदार हे तस्कर मुळे बाबत सोयीस्कर मौन बाळगून आहेत. तुळजापूर येथे अशीच भविष्यात स्तिथी राहिली तर नेतृत्वाच्या संकल्पनेतील शास्वत विकास कामे प्रत्यक्षात अवतरण्या आधी अत्याधुनिक सुविधा असलेले ड्रग्ज व्यसनमुक्ती केंद्र इथे सुरु करावे लागेल, त्यासाठी पण हे वेगवेगळे जागतिक दर्जाचे मॉडेल सांगुन योगदान देतील यात तुळजापूरकरांना तीळमात्र शंका नाही.