धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी रॅकेटची मुंबई येथील 32 वर्षीय तस्कर संगीता वैभव गोळे (माहेरचे नाव संगीता दादाराव आहेर) हिचा अंगरक्षक ते ड्रग्ज तस्कर हा प्रवास एखाद्या चित्रपट कथेसारखा आहे. उपलब्ध कागदपत्रानुसार संगीता ही मुबंईतील बीकेसी भागातील टाप सेक्यूरिटी येथे अंगरक्षक आहे, मात्र प्रत्यक्षात ती एक राज्यातील मोठी ड्रग्ज तस्कर असल्याचे धाराशिव पोलिसांच्या तपासातुन समोर आले आहे. गेली अनेक वर्षापासुन राज्यभर ड्रग्ज तस्करी करणारी संगीता तपास यंत्रणांना चकवा देत होती मात्र धाराशिव पोलिसांच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे अखेर जाळ्यात अडकली असुन जेलची हवा खात आहे. तीच्या एका बँक खात्यावर 5 करोडो, पोलिस तपासात पाव किलो सोने व चारचाकी गाडी जप्त, म्युचवल फंड व मुंबई, लोणावळा येथे मालमत्ता अशी तिची करोडोंची संपत्ती आहे. अनेक तरुणांचे संसार व आयुष्य उध्वस्त करुन तिने ‘माया’ कमावली आहे. तिची ही संपत्ती धाराशिव पोलिसांच्या रडारवर असुन कारवाईला सुरुवात केली आहे. बँक खाते फ्रीझ केले असुन आगामी काळात ड्रग्जमधुन कमावलेली संपत्ती जप्तीची कारवाई होऊ शकते. टाप सेक्यूरिटी पण चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहे.
मुंबई येथील तस्कर संगीता गोळे व तिचा पती वैभव, दीर अभिनव हे सगळे कुटुंब ड्रग्ज तस्करीत सहभागी असुन पती व दीर याच्यावर तस्करीचे अनेक गुन्हे नोंद आहेत. तुळजापुरातील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे हा गेली 3 वर्षांपासुन गोळे परिवाराच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले असुन ड्रग्ज तस्करीचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. संगीता गोळे हिच्या एका खात्यावर 5 कोटी सापडले असुन इतर बँक खात्याचा व तीचे कोणासोबत आर्थिक व्यवहार झाले याचा शोध सुरु आहे. संगीताला 22 फेब्रुवारीला अटक केल्यानंतर 14 दिवसांच्या पोलिस कोठडीत महत्वाचे धागेदोरे मिळाले असुन बँक खाते,आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल याचे तांत्रिक विश्लेषण सुरु आहे. संगीता हिचे मुंबई, लोणावळा येथेही मोठे नेटवर्क व संपत्ती आहे. संगीता व पिंटू मुळे हे गेली 3 वर्ष तुळजापूर येथे ड्रग्ज तस्करी करीत होते. संगीता जेलमध्ये आहे, पती वैभव फरार आहे तर पिंटू मुळे 13 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत आहे.
संगीता मुंबईतून कुणाकडुन इग्ज खरेदी करुन तुळजापुर येथील कोणाकोणाला ड्रग्ज विक्री करीत होती, तिला ड्रग्ज पुरवणारा सिंडीकेटचा मालक, फायनासर कोण याचा तपास सुरु आहे. तुळजापूर ड्रग्ज रॅकेट तपासात पोलिसांनी आजवर 3 वेळेस ड्रग्ज जप्त केले आहे, 63 ग्रॅम वजनाच्या त्यात 89 पुड्या ड्रग्ज होते. ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी आतापर्यंत 16 जणांना आरोपी केले असुन त्यातील 10 जणांना अटक केली आहे तर 6 आरोपी फरार आहेत. 4 आरोपी जेलमध्ये आहेत तर उर्वरित 6 जण पोलिस कोठडीत आहेत, 4 जणांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहे, ती कोर्टात सादर केली आहेत.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी ठोस भुमिका स्पष्ट करीत ड्रग्ज तस्करावर कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस अधीक्षक संजय जाधव व तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत त्यामुळे पोलिसांना अपेक्षित यश मिळत आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे दिवसरात्र तपास करीत आहेत. ड्रग्ज सिंडीकेटचा ‘आका’ व त्या ‘आका’ ला पाठबळ देणारा ‘बोका’ उघड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.