धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात धाराशिव पोलिसांनी आजवर 35 जणांना आरोपी केले असुन राज्यातील किंबहुना देशातील ही सर्वात जास्त आरोपी असलेली कारवाई ठरणार आहे. ड्रग्ज तस्करीच्या एका गुन्ह्यात आजवर इतक्या मोठया प्रमाणात आरोपी झालेले नाहीत, आरोपींची संख्या वाढू शकते. धाराशिव पोलीस कॉल डिटेल, आर्थिक व्यवहार ( बँक, फोन पे) यासह अन्य मुद्याची तांत्रिक तपासणी करीत आहेत, जवळपास 100 जणांना नोटीसा पाठवण्यात आल्या असुन अनेक जण रडारवर आहेत. 14 फेब्रुवारीला 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या पोलिसांनी तामलवाडी येथे पकडत 3 आरोपीना अटक केली त्यात 3 वरून आरोपींची संख्या 35 वर गेली आहे. देशात व राज्यात हजारो कोटींचे व किलोवर ड्रग्ज सापडूनही आरोपी संख्या 10-15 च्या वर गेलेली नाही मात्र धाराशिवमध्ये बऱ्यापैकी यश आले आहे. ड्रग्ज तस्करीचे मोठे सिंडीकेट तुळजापूर व धाराशिव जिल्ह्यात कार्यरत असल्याचा पोलिसांचा कोर्टात दावा आहे. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी ड्रग्ज मुक्तीचा ‘विडा’ उचलला असुन ‘ड्रग्जमुक्त तुळजापूर’ चा संकल्प केला आहे.
35 पैकी पोलीस कोठडीत 4 व 21 आरोपी फरार आहेत, त्यांना पकडल्यावर आणखी उकल होऊन आरोपी व तस्करीचे जाळे उघड होणार आहे. ड्रग्ज सुरुवातीला कोण आणले? त्याचा हेतू काय? व्यापार व गुंतवणूक कोण केली? कोणाला आर्थिक व इतर फायदा झाला ? कमावलेला पैसा कुठे गुंतवला? पेडलरचे जाळे कसे निर्माण केले व कोणाकोणाला व्यसनांध केले? यासह अनेक प्रश्नाचे कोडं यांना अटक केल्यावर सुटणार आहे. तस्करीचा ‘आका’ व ‘बोका’ कोण हे अजुन समोर आले नाही.
माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद जमदडे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर,प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक शिंदे,अभिजीत गव्हाड, मुंबई येथील संतोष खोत व तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,रणजित पाटील,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 21 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. काही आरोपी राजकीय पक्ष व नेत्यांशी संबंधित असल्याने पोलिसांवर दबाव व हस्तक्षेप असल्याचे अनेक घटनेतुन समोर आले आहे, तो कमी झाला तर आणखी यश येईल.
पोलीस कोठडीतील 4 आरोपी असुन त्यात पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके (5 एप्रिल पर्यंत) व राहुल कदम – परमेश्वर (7 एप्रिल पर्यंत) व गजानन हंगरकर (8 एप्रिल पर्यंत) पोलिस कोठडीत आहेत. धाराशिव कारागृहात 10 आरोपी असुन त्यात अमित उर्फ चिमू आरगडे,युवराज दळवी, संदीप राठोड, संगीता गोळे, संतोष खोत, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे, संकेत शिंदे यांचा समावेश आहे.
तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळेला 22 फेब्रुवारी अटक केली तीच्या एका बँकेच्या खात्यावर 5 कोटी व घरातुन पाव किलो सोने जप्त केले. संतोष खोतला 27 फेब्रुवारी,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 28 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. सोलापूरहुन ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या 4 जणांना 18 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 30 पुड्या ड्रग्जसह 4 मार्च रोजी अटक करण्यात आली. पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके या दोघांना 23 मार्चला, राहुल कदम-परमेश्वर याला 24 मार्चला अटक केली त्या दिवशी 4 गोपनीय व नवीन 6 अशी 10 जणांची नावे उघड केली. गजानन हंगरकर याला 25 मार्चला अटक केली त्यानंतर पोलिसांनी कोर्टात 26 मार्चला नवीन 10 आरोपींची नावे जाहीर केली.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी बैठक घेत कारवाईचे आदेश दिले. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी ड्रग्ज प्रकरणी संसद, विधीमंडळात आवाज उठवला. पोलिसांकडे कोणतीही ठोस माहिती नव्हती असा दावा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केला आहे. मी 3 वेळेस ड्रग्ज तस्करीबाबत लागणारी माहिती, टीप पोलिसांना दिली त्यामुळे हे उघड झाले असे त्यांचे म्हणणे आहे. काही राजकीय पक्षाशी व व्यक्तीशी संबंधित आरोपी असले तरी ते उघड झाल्याने ड्रग्ज तस्करीची कीड नष्ट होईल अशी आशा आहे. पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. या सर्व टीमच्या तपासामुळे रॅकेटचा भांडाफोड झाला.ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी 3 वेळेस पोलिसांनी ड्रग्ज जप्त केले, त्यात 63 ग्रॅम वजनाच्या 89 पुड्या होत्या.