धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथे गेल्या 3 वर्षापुर्वीपासुन ड्रग्ज विक्री सुरु होती त्यावेळी गणेश उत्सव काळात एका मंडळाने जनजागृती व कारवाई करावी या हेतूने ड्रग्ज मुक्त तुळजापूर हे पोस्टर लावले त्यावेळी प्रशासन, पोलीस, राजकीय नेते, पत्रकार सगळे गप्प राहिले. त्यावेळी जर दखल घेऊन आवाज उठवला असता तर ड्रग्ज तिथेच थांबले असते त्यामुळे यात समाजातील सर्व घटक जबाबदार आहेत. तेव्हा कारवाई केली नाही मात्र आता काही लोकांमुळे संपुर्ण पुजारी वर्गाला बदनाम केले जात असल्याचा आरोप पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी केला.
एका पुजाऱ्याने ड्रग्जचा विषय बैठकीत तत्कालीन पोलिस अधीक्षक यांच्यासमोर जाहीर मांडला, काही गोपनीय नावे दिली, पुजाऱ्यांनी लेखी पत्रव्यवहार केला, आंदोलन केले, बैठका घेत विषय बाहेर काढला मात्र त्यांची काही जन बदनामी करीत आहेत. ड्रग्ज मुक्तीसाठी आमचा कायम पुढाकार राहिला आहे व पुढेही राहील असे ते म्हणाले. स्थानिक पोलीस, लोकप्रतिनिधी, पत्रकार या सगळ्यांना ड्रग्जची माहिती होती मात्र त्यांनी आवाज उठवला नाही किंवा कारवाई केली नाही.