ड्रग्स तस्करीचा नायनाट करण्याची जबाबदारी माझी, कारवाईचा अहवाल द्या – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक आक्रमक
धाराशिव – समय सारथी
ड्रग्ज तस्करीबाबत राज्याचे परिवह मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आक्रमक भुमिका घेतली असुन पोलिस अधीक्षक यांना कारवाईसाठी 72 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. ड्रग्ज तस्करीत पोलिस व राजकीय नेता सहभागी असल्यास त्याला जेलमध्ये घालणार असे सांगत त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. ड्रग्स तस्करीचा नायनाट करण्याची जबाबदारी माझी आहे, पोलिसांनी कारवाईचा अहवाल द्यावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे असे म्हणत पालकमंत्री प्रतापराव सरनाईक आक्रमक झाले.
मी तुळजापूरला आल्यावर बैठक घेतली काही पुजारी व नागरिकांनी मुख्यमंत्री व मला निवेदन दिले आहेत, तुळजापूर शहरासह जिल्ह्यात ड्रग्ज माफियाचा सुळसुळाट असुन यात काही जण सहभागी आहेत, आई तुळजाभवानीच्या तुळजापूमध्ये असा प्रकार होत असुन तो निंदनीय आहे, याचा निषेध करायला हवा. मंत्रीमंडळ बैठकीत तुळजापूर ड्रग्ज माफियाच्या विषयावर चर्चा झाली, अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी या विषयावर जातीने लक्ष घातले आहे, तश्या मला सुचना दिल्या आहेत. तुळजापूर नव्हे तर धाराशिव जिल्ह्यातुन ड्रग्ज तस्करीचा नायनाट करण्याची जबाबदारी मी आजपासुन घेतली आहे. कितीही मोठा ड्रग्ज तस्कर असला तरी त्याला व एकही ड्रग्ज तस्कर सोडला जाणार नाही, तो कितीही मोठा असला तरी त्याला सोडणार नाही. कितीही राजकीय हस्तक्षेप असला तरी प्रताप सरनाईक त्याला सोडणार नाही, जेलमध्ये टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, तश्या कारवाईच्या सुचना पोलिसांना दिल्या आहेत. ड्रग्ज तस्करीत पोलिस, राजकीय नेता सहभागी असले तर त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय प्रताप सरनाईक स्वस्थ बसणार नाही. पोलिस अधीक्षक यांना लेखी सुचना दिल्या असुन आजपासुन 72 तासात ड्रग्ज तस्करी व कारवाईचा लेखी अहवाल द्या. 72 तासात कारवाई केली नाही तर स्थानिक पोलिस व इतर अधिकारी यांच्यावर कारवाई करणार असा इशारा पालकमंत्री सरनाईक यांनी दिला आहे. ड्रग्ज तस्करीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.