धाराशिव – समय सारथी
तुळजापूसह धाराशिव जिल्ह्यातील ड्रग्ज तस्करीचा तपास केंद्रीय नार्कोटीक्स विभागाकडे द्यावा व यातील दोषी गुन्हेगारांना जेलमध्ये टाकावे अशी मागणी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत केली. शुन्य प्रहर दरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी ड्रग्ज प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली. 3 वर्षांपासुन ड्रग्ज तस्करी होत होती याला आशीर्वाद कोणाचा, स्थानिक पोलीस यात सहभागी होते असा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी करीत कारवाईची मागणी केली. ओमराजे एनसीबीला भेटून कारवाईचे निवेदन देणार आहेत.
शून्य प्रहर हे जनतेचे गंभीर प्रश्न, सामाजिक समस्यावर तातडीने आवाज उठवण्याचे संसद कामकाजातील प्रभावी साधन असून सरकारला त्यावर कारवाई करावी लागते. बहुतेकदा सभापती किंवा अध्यक्ष संबंधित मंत्रालयाला कारवाई करण्याच्या सूचना देतात. यानंतर मंत्रालय योग्य ती पावले उचलते व सरकार काय केले याचे उत्तर देते, त्यामुळे ड्रग्ज प्रकरणी केंद्र सरकार काय भुमिका घेते हे पाहावे लागेल.
धाराशिव जिल्ह्यातील परांडा आणि तुळजापूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जची वाहतूक आणि विक्री होत असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या आमली पदार्थांच्या सेवनामुळे विशेषतः तरुण वर्गाच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असून, त्यांची पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तुळजापूरला विक्रीसाठी येणारे ड्रग्ज पोलिसांनी तामलवाडी येथे पकडले व 3 जणांना अटक केली. इतके प्रकरण गंभीर असताना जिल्हा पोलीस प्रशासन यांनी या प्रकरणाचा तपास सुरूवातीला हेड कॉन्स्टेबल, नंतर पीएसआय व त्यानंतर एपीआयकडे दिला. सदरील प्रकरण गंभीर आहे त्यामुळे या प्रकरणात दोषी असणाऱ्यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मार्फत धाराशिव जिल्ह्यातील ड्रग्ज सिंडिकेट पूर्णतः नष्ट करावे, सखोल चौकशी करून गुन्हेगारांचे सर्व पाळेमुळे शोधावे. सोलापूर, मुंबई आणि स्थानिक ड्रग्ज पेडलर्सच्या माध्यमातून एमडी ड्रग्जच्या वाहतूक आणि खरेदी-विक्रीमध्ये समाविष्ट असलेल्या धाराशिव येथील गुन्हेगारांवर कारवाई करावी.