धाराशिव – समय सारथी
ड्रग्ज तस्करीत आरोपीना अटक होत असतानाच नवनवीन बाबी पोलिस तपासात समोर येत आहेत. तुळजापूरसह धाराशिव शहरात रॅकेट असुन इतर आरोपी सक्रीय आहेत, रॅकेटचे उच्चाटन करणे बाकी असल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 2 आरोपीना अटक केल्यावर पोलिसांनी त्यांच्याकडुन काही पुरावे हस्तगत करीत अधिक तपासासाठी 14 दिवसांची पोलिस कोठडी मागितली त्या दरम्यान पोलिसांनी धाराशिव शहरात रॅकेट असल्याचा लेखी दावा केला आहे तसेच याचा तपास करायचा आहे असे म्हणटले आहे . ड्रग्ज तस्करीचे व सेवनाचे जाळे हे जिल्हाभर असल्याचे आजवरच्या तपासातून समोर येत आहे. तुळजापूर येथे ड्रग्ज सापडल्यावर धाराशिव शहरात ड्रग्ज असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात होते मात्र आता पोलिसांच्या दाव्याने त्याला पुष्टी मिळाली आहे.

तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणी अटक केलेल्या 2 तस्करांना धाराशिव येथील कोर्टाने 5 एप्रिल पर्यंत 13 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ड्रग्ज तस्करीत आरोपीचा सहभाग, आर्थिक व्यवहार व इतर बाबी सापडल्याने सुल्तान उर्फ टिपू शेख याला पुणे येथून तर सोलापूर येथून जीवन साळुंके याला अटक केली. त्यानंतर कोर्टात त्यांना हजर केल्यावर पोलिसांनी 14 दिवसांची पोलिस कोठडी मागितली त्यावर कोर्टाने 5 एप्रिल पर्यंत कोठडी सुनावली. यातील दोन्ही आरोपीवर गंभीर गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे. सुल्तान याच्या माध्यमातुन साळुंके याने तुळजापूर येथे ड्रग्ज विक्री केल्याचे समोर आले आहे.
सुल्तान उर्फ टिपू शेख याच्यावर पुणे येथील बंडगार्डन पोलिस ठाण्यात तब्बल 16 गुन्हे नोंद असुन त्याच्यावर हद्दपारीसह मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे. सुल्तान याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जाळपोळ, गंभीर मारहाण, शासकीय कामात अडथळा, आर्म ऍक्ट असे 16 गुन्हे नोंद आहेत तर जीवन नागनाथ साळुंके याच्यावर सोलापुर व तुळजापूर येथे 3 गुन्हे नोंद आहेत, त्यात दरोडा गंभीर मारहाण व चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.4 मार्च नंतर तब्बल 20 दिवसानंतर पोलिसांना ड्रग्ज रॅकेटमध्ये नवीन आरोपी अटक करण्यात यश मिळाले असुन महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. पुणे व सोलापूर ड्रग्ज तस्करी लिंक यानिमित्ताने उघड झाली आहे.
पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम , उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तामलवाडीचे पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे दिवसरात्र तपास करीत आहेत. ड्रग्ज तस्करीत आरोपींची संख्या 16 वरून 18 झाली आहे, त्यातील 2 जण पोलिसांच्या कोठडीत, 10 जण जेलमध्ये आहेत तर तुळजापूर येथील पिनू तेलंग व मुंबई येथील वैभव गोळे हे 2 जण फरार आहेत. 4 नावे पोलिसांनी गोपनीय ठेवत ती डायरीत नमुद केली आहेत.आणखी काही नावे तपासात निष्पन्न होऊ शकतात व आरोपीची संख्या वाढू शकते. त्या 4 आरोपीच्या मागावर पोलिस आहेत.