धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात अनेक घडामोडी, आरोप प्रत्यारोप होत असतानाच काही ‘नाट्यमय’ बाबी समोर येत आहेत. तुळजापूर येथे विक्रीसाठी येणारे ड्रग्ज तामलवाडी येथे पकडण्यात आले, पोलिसांनी केलेली ही कारवाई एका खबऱ्याच्या ‘टीप’ नंतर करण्यात आल्याचा ठोस दावा काही जण करीत आहेत. टीप देणारा ‘भाई’ सुरुवातीला ड्रग्ज व्यसनात पुरता अडकला,गुजरातच्या व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन ‘मन’ आणि ‘मत’ परिवर्तन झाल्यानंतर ‘जंटलमन’ झाला. ड्रग्जची ‘कीड’ साफ करण्याचा ‘विडा’ उचलला आणि त्यातूनच पोलिसांच्या मदतीने ड्रग्ज तस्करी बाहेर आणली असे सांगितले जात आहे. ‘भाई’ केवळ ड्रग्जचे सेवन करीत होता, व्यापार नाही त्यामुळे तो स्वतः एक ‘पिडीत’ आहे, त्याच्यावर अगोदरच खुप अन्याय झाला आहे, अशी ‘भावनिक लाट’ तयार केली जात आहे. भाईचे तस्कर, पेडलर याच्याशी संपर्क (सीडीआर) सापडल्याचे कळते मात्र केवळ सीडीआरच्या आधारे त्याला आरोपी करायचे की ‘खबऱ्या’ म्हणुन सोडून द्यायचे यावर खलबते सुरु आहेत.

‘खबऱ्या’ बनलेल्या भाईला तुळजापूर येथील ड्रग्जच्या बिकट स्तिथीचा ‘पश्चाताप’ झाला आहे, त्याला आता ‘प्रायश्चित’ करायचे आहे त्यामुळे त्याला पिडीत समजा, आरोपी करू नका हवं तर साक्षीदार करा असा सल्ला देत प्रतिष्ठा पणाला लागल्याने पेचप्रसंग उभा राहिला आहे शेवटी निर्णय पोलिसांच्या कोर्टात होणार आहे. ‘भाई’ ला पश्चाताप झाल्याने त्याला सोडून सगळ्यांना आत टाका, तो सगळी नावे सांगेल अशी ‘शुद्धीकरण योजना’ मांडली गेली आहे. ड्रग्जचे सेवन करणारे व कमी जास्त गुंतलेले सगळेच ‘पिडीत’ आहेत मग आम्ही काय ‘पाप’ केले होते ज्यामुळे आम्हाला अडकवले असा प्रश्न इतर विचारत आहेत. भाईने ‘रस्ता’ दाखवला व त्यामुळेच आम्ही ‘चव’ चाखली, ‘शुद्धीकरण योजनेची’ संकल्पना आम्हाला सांगितली असती तर कदाचित आम्हीही ‘भाई’ पेक्षा चांगली ‘टीप’ देत ड्रग्ज पकडून दिले असते व पहिल्या रांगेत ‘लाभार्थी’ झालो असतो, असे म्हणत अटक केलेले आणि रडारवर असलेले काही जण ‘खडे’ फोडत आहेत. असा ‘दुजाभाव’ का असाही प्रश्न विचारत आहेत. भाईला आरोपी केले तर ‘खबरी’ जगतात चुकीचा संदेश जाईल मग तुम्हाला ‘टीप’ कोण देणार, व्यसन करणाऱ्या सगळ्यांना आरोपी केले तर मोठी यादी वाढेल अशी ‘पेरणी’ करीत ‘वातावरण’ निर्मिती केली जात आहे. काही ‘स्पेशालिस्ट’ कायद्याचा किस पाडत ‘अर्थ’ लावत आहेत.
पोलिसांनी 3 वेळेस तुळजापूर येथून ड्रग्ज जप्त करीत 16 जणांना आरोपी केले त्यातील 10 जणांना अटक केली असुन 2 आरोपी फरार आहेत तर 4 जणांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत, त्यात कोणाचे नाव आहे यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तुळजापूर तालुक्यातील सराटीचा विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे हा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी संबंधित असुन तो माजी सभापतीचा मुलगा आहे, सत्तेची ‘फळे’ चाखल्यानंतर ड्रग्ज तस्करीत त्याला कर्माची फळे भोगण्यासाठी जेलची ‘हवा’ खावी लागत आहे. गटबाजी, रस्सीखेच,आरोप प्रत्यारोप, चर्चा काहीही असो तुळजापुरातील ड्रग्ज तस्करी पाहिल्यांदाच कागदावर आली व काही प्रमाणात तरुण व्यसनाध होण्यापासुन वाचले हे पोलिसांचे मोठे यश आहे. पोलिस अधीक्षक संजय जाधव यांच्यासह उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, सपोनी गोकुळ ठाकुर व त्यांच्या टीमला श्रेय द्यावे लागेल. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत त्यामुळे अनेक बाबी समोर येत आहेत.