महिना उलटला, नावे गोपनीय ठेवुनही ‘ ते’4 आरोपी सापडेना, मुख्य सुत्रधार मोकाटच – पोलिसांवर दबाव
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे सुरुवातीपासुनच केंद्रस्थानी राहिले आहेत. पोलिसांनी तामलवाडी येथे 14 फेब्रुवारी रोजी कारवाई करीत 3 तस्करांना ड्रग्जसह अटक केली ही कारवाई आमदार पाटील यांनी दिलेल्या ‘टीप’ नंतर करण्यात आल्याचे त्यांनी स्वतः जाहीर सांगितले. दोनदा अपयश आल्यावर खबऱ्या भाईने पोलिसांना ‘टीप’ दिल्यावर तिसऱ्या वेळी कारवाई यशस्वी झाली. या दोन्ही बाबीत काही प्रमाणात तथ्य असले तरी त्याला वेगळीच किनार आहे.
पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवुन सगळे डावपेच रचले गेल्याची चर्चा तुळजापुरात रंगत आहे. हेवेदावे व विरोधी कारवाई करणाऱ्यांना काहींना यात शिस्तीत गोवत ‘काटा’ काढला जात असल्याचाही चर्चा आहे. पकडण्यात आलेला तस्कर विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे व आमदार पाटील यांचे घनिष्ठ संबंध असल्याचे फोटो समोर आले, त्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे आमदार कैलास पाटील यांनी लक्षवेधी उपस्थितीत केला. विधीमंडळात पटलावर उत्तर येण्यापुर्वीच आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे स्विय सहायक गणेश भातलवंडे यांनी पोलिस अधीक्षक यांचे पत्र सोशल मीडियावर लीक केले. पोलिसांच्या प्रत्येक बाबीवर आमदारांचे लक्ष आहे हेच दिसते. ड्रग्ज प्रकरणात पोलिसांवर दबाव व हस्तक्षेप होत असल्याचे वरील अनेक बाबीमुळे अधोरेखित झाले आहे.
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी 19 जणांना आरोपी केले असुन त्यातील 4 जणांची नावे गोपनीय ठेवली आहेत नावे गोपनीय ठेवुन एक महिना होत आला तरी पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आलेले नाही. ड्रग्ज तस्करीत 3 जण अटकेत आहेत तर 10 जण जेलमध्ये, 2 जण फरार आहेत. 19 आरोपी निष्पन्न झाले तरी मुख्य म्होरक्या कोण हे समोर आले नाही व अटकही झाले नाही. पोलिसांवर जनतेचा व काही राजकीय मंडळीचा दबाव असल्याची चर्चा आहे. ती 4 नावे कोण, त्यांच्यासह मुख्य सुत्रधार याला अटक करा अशी मागणी जनतेतून आहे तर त्या 4 जणांना वाचवण्यात व मुख्य सुत्रधार याला अलिप्त ठेवण्यात काही जण मदत करीत आहेत. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुळे याचे घनिष्ठ संबंध व त्यांचे स्वीय सहायक यांनी लीक केलेले लक्षवेधीचे उत्तर यावर सोयीस्कर मौन बाळगले आहे. ड्रग्ज तस्करीचा आका व बोका समोर येणे गरजेचे आहे.