धाराशिव – समय सारथी
ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी तामलवाडी येथे 14 फेब्रुवारी रोजी कारवाई करीत आरोपीना ड्रग्जसह अटक केली. गुन्हा नोंद होऊन जवळपास 2 महिने झाल्याने, काही जेलमधील आरोपीनी नियमित व फरार आरोपीनी अटकपुर्व जामीनीसाठी अर्ज केल्याने पोलिसांनी आजवर झालेल्या तपासावर आधारित दोषारोपपत्र (चार्जशीट) कोर्टात सादर करण्याची तयारी सुरु केली आहे. येत्या 2-3 दिवसात ते कोर्टात दाखल होणार आहे. विशेष म्हणजे ड्रग्ज तस्करीत फरार आरोपी विनोद पिटू गंगणे यांचे बंधु विजय गंगणे यांनी पत्रकार परिषद घेत मंगळवारी कोर्टात चार्जशीट दाखल केले जाणार असल्याचा दावा केला आहे, या दाव्याने संशय कल्लोळ निर्माण झाला आहे.
विजय गंगणे यांना ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी चौकशीची नोटीस बजावली असुन त्यांनी दोषारोप पत्र बाबत दावा केला आहे, त्यामुळे चाललंय तरी काय हा प्रश्न विचारला जात आहे. गुन्हा नोंद झाल्यापासुन पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले व दबाव असल्याचे बोलले जात होते त्याला विजय गंगणे यांच्या या जाहीर दाव्याने पुष्टी मिळाली आहे. एकंदरीत पोलिसांवर दबाव असल्याचे दिसते त्यामुळे दोषारोप पत्रात दडलंय काय? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. आम्ही कायद्याने कारवाई आहोत, कोणाला सोडणार नाही असा दावा पोलिस अधीक्षक संजय जाधव करीत आहेत मात्र गंगणे यांच्या वादग्रस्त वक्तव्य व दाव्याने संशय कल्लोळ निर्माण केला आहे. संगीता गोळेची पुढील लिंक शोधून दाखवा असे आवाहन गंगणे यांनी तपास यंत्रणाना केले आहे, त्यावर पोलिस हतबल आहेत.
तुळजापूर येथे पत्रकार परिषद घेण्यासाठी विशेष दुतामार्फत खास निरोप, सर्व व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी नियोजन, आखणी करण्यात आली. ‘काडी’ लावणारे नेतृत्व आता तुळजापुरचे लोक बोलत आहेत ते पाहून घेतील असे म्हणत ‘मजा’ घेत असुन तो कोण याची चर्चा रंगली आहे. पत्रकार यांनी पाठपुरावा करू नये यासाठी दबाव, बदनामी,धमकी आणि त्यानंतर चारित्र्य हनन असे वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मुख्यमंत्री यांनी लक्ष घातले असल्याने यात काय निष्पन्न होते हेही तितकेच महत्वाचे आहे, परंडा येथे ड्रग्ज कारवाईत कॅल्शियम क्लोराईड निघाले. 2 आरोपीना निर्दोष सोडा असे म्हणत गुन्हा रद्द करण्याची शिफारस कोर्टात करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली. ड्रग्ज लक्षवेधीचे उत्तर लीक करण्यात आले. तामलवाडी गुन्ह्यात राज्य सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
निष्पन्न आरोपी, कागदपत्रे, झालेला तपास, समोर आलेले व उपलब्ध पुराव्या आधारे पोलीस पुराव्याची साखळी जोडत असुन त्याआधारे प्रत्येकाचा सहभाग अधोरेखित केले जाणार आहे. ड्रग्ज तस्करासोबत झालेले बँक डिटेलचे आर्थिक व्यवहार, ऑडियो रेकॉर्डिंग तपासात सापडले असुन त्याचे आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत तसेच कॉल डिटेल व इतर पुरावे मिळाले आहेत.त्या आधारे तस्कर, पेडलर, व्यसन करणारे असे वर्गीकरण केले जाणार आहे. ड्रग्ज तस्करीचा मुळं हेतू काय,कोण व का आणले? फायनान्सर कोण? किती संपत्ती कमावली? यासह अनेक मुद्दे पोलिसांनी कोर्टात रिमांड वेळी उपस्थितीत केले होते त्या सगळ्यांची प्राथमिक उत्तरे या दोषारोप पत्रात मिळण्याची शक्यता आहे. काही आरोपी दोषारोपपत्र कोर्टात सादर होण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत फरार आहेत. या प्रकरणात नंतर पुरवणी दोषारोपपत्र सादर केले जाऊ शकते. निष्पन्न 35 पैकी 21 आरोपी फरार असुन 14 जन जेलमध्ये आहेत, 9 जणांनी जामीनीसाठी अर्ज दाखल केला आहे. संगीता गोळेकडे 5 कोटी व पाव किलो सोने सापडले, इतर आरोपीकडे काय हे दोषारोप पत्रात येईल का?
जवळपास 80 पेक्षा अधिक जणांना नोटीसा पाठवल्या असुन त्यांचे जबाब नोंदविणे झाले आहे, त्यावर निर्णयाची प्रक्रिया सुरु आहे. यात काही साक्षीदार तर काही जन आरोपी होणार असल्याचे कळते. तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात 35 पैकी 14 आरोपी जेलमध्ये असुन 21 आरोपी फरार आहेत, त्यातील काही जन महिना उलटून गेला तरी फरार असुन पोलिसांना ते सापडले नाहीत. त्यांचा शोध सुरु आहे, या आरोपीना अटक कधी होणार? हा प्रश्न आहे. जेलमध्ये असलेल्या 7 जणांनी नियमित तर 2 जणांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले आहेत तर माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे यांनी सावध भुमिका घेत अर्ज माघारी घेतला आहे. धाराशिव जेलमध्ये असलेली महिला ड्रग्ज तस्कर संगीता गोळे, मुंबईतील तस्कर संतोष खोत, फरार आरोपी वैभव गोळे, युवराज दळवी, अमित अरगडे, संकेत अनिल शिंदे, संदीप राठोड,स्वराज उर्फ पिनू तेलंग व इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकुर यांनी अर्ज केला आहे, त्यावर सुनावणी टप्पा सुरु असुन निर्णय झालेला नाही.
माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद जमदडे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर,प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक शिंदे,अभिजीत गव्हाड, मुंबई येथील संतोष खोत व तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,रणजित पाटील,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 21 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. धाराशिव कारागृहात 14 आरोपी असुन त्यात अमित उर्फ चिमू आरगडे,युवराज दळवी, संदीप राठोड, संगीता गोळे, संतोष खोत, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे, संकेत शिंदे, पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख, सोलापूर येथील जीवन साळुंके, राहुल कदम – परमेश्वर व गजानन हंगरगेकर यांचा समावेश आहे.
पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. या सर्व टीमच्या तपासामुळे रॅकेटचा भांडाफोड झाला.ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी 3 वेळेस पोलिसांनी ड्रग्ज जप्त केले, त्यात 63 ग्रॅम वजनाच्या 89 पुड्या होत्या.