मुंबईतील तस्कर संतोष खोत व विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे 13 मार्चपर्यंत पोलिस कोठडी, फायनासर कोण ?
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मुंबई येथील तस्कर संगीता गोळे हिचे बँक खाते गोठवण्यात (फ्रिज) आले असुन मुंबई येथून तीच्या घरातुन पाव किलोच्या आसपास सोने जप्त करण्यात आले आहे. बँक खाते सील करण्यासोबतच ड्रग्ज मधुन कमावलेले सोने, चारचाकी गाडी पोलिसांनी तपासात जप्त केली आहे. गोळे हिच्या एका खात्यावर 5 कोटी सापडले असुन इतर बँक खात्याचा व तीचे कोणासोबत आर्थिक व्यवहार झाले याचा शोध सुरु आहे. संगीता व पिंटू मुळे हे गेली 3 वर्ष तुळजापूर येथे ड्रग्ज तस्करी करीत होते. संगीता जेलमध्ये आहे तर पिंटू मुळे व मुंबईतील संतोष खोत हे 13 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत आहे. मुंबई, तुळजापूर सोबतच हे तस्करीचे सिंडीकेट राज्यभर असुन ते शोधणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे. संगीताच्या 14 दिवसांच्या पोलिस कोठडीत महत्वाचे धागेदोरे मिळाले असुन त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरु आहे. संगीता हिचे मुंबई, लोणावळा येथेही मोठे नेटवर्क व संपत्ती आहे. विश्वनाथ उर्फ पिंटू मुळेला ड्रग्ज माल खरेदीसाठी पैसे कोण दिले, त्याने किती लोकांना ड्रग्ज विकले, डीलर कोण, या रॅकेटचा फायनासर कोण, कोणाला आर्थिक लाभ झाला याचा तपास सुरु आहे.
मुंबई येथील तस्कर संगीता गोळे व तिचा पती वैभव, दीर अभिनव हे सगळे कुटुंब ड्रग्ज तस्करीत सहभागी आहे. गोळे याच्या संपर्कात विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे हा गेली 3 वर्षांपासुन असल्याचे निष्पन्न झाले असुन तसे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. संगीता व पिंटूच्या जोडीने तुळजापूरला ड्रग्जची गोळी दिली असुन ड्रग्ज विक्रीतून या दोघांनी करोडो रुपयांची संपत्ती कमावली आहे. तुळजापूरला पिंटू मुळे याने सर्वप्रथम ड्रग्ज विक्री करायला सुरुवात केल्याची कबुली आरोपी संगीता व संतोष खोत याने दिली आहे. एकेकाळी कर्जबाजारी असलेला मुळे हा ड्रग्ज तस्करीत करोडपती झाला असुन पोलिस त्याच्या व संगीताच्या बँक खाते, संपत्तीचा व आर्थिक व्यवहाराचा शोध घेत आहेत. मुंबई येथील तस्कर संतोष खोत 13 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत आहे तर वैभव गोळे, पिनू तेलंग फरार आहे.
संगीता हिच्या एका बँक खात्यावर तब्बल 5 कोटी पेक्षा अधिक बँक व्यवहार पोलीस तपासात सापडले असुन ड्रग्ज तस्करीतुन मिळालेले पैसे तिने सोने, म्युचवल फंड व मुंबई येथे स्थावर मालमत्ता विकत घेतल्याचे समोर आले आहे. संगीता हिचे सोलापूरसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील लोकांशी संपर्क असल्याचे निष्पन्न झाले आहे. अनेक लोकांची कुटुंब उध्वस्त करीत या महिलेने व पिंटू मुळेने करोडो रुपयांची मालमत्ता कमावली आहे, ही मालमत्ता जप्तीची कारवाई पोलीस करणार का ? हे पाहावे लागेल. तुळजापूर ड्रग्ज रॅकेट तपासात पोलिसांनी आजवर 3 वेळेस ड्रग्ज जप्त केले आहे, 63 ग्रॅम वजनाच्या त्यात 89 पुड्या ड्रग्ज होते. ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी आतापर्यंत 16 जणांना आरोपी केले असुन त्यातील 10 जणांना अटक केली आहे तर 6 आरोपी फरार आहेत. 4 आरोपी जेलमध्ये आहेत तर उर्वरित 6 जण पोलिस कोठडीत आहेत, 4 जणांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहे, ती कोर्टात सादर केली आहेत.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी ठोस भुमिका स्पष्ट करीत ड्रग्ज तस्करावर कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस अधीक्षक संजय जाधव व तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत त्यामुळे पोलिसांना अपेक्षित यश मिळत आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. ड्रग्ज सिंडीकेटचा ‘आका’ व त्या ‘आका’ ला पाठबळ देणारा ‘बोका’ उघड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.