धाराशिव – समय सारथी
श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य आणि अत्याधुनिक ड्रोन शो आज मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. धाराशिव जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या ड्रोन शोने भाविकांचे लक्ष वेधून घेतले असून, आधुनिक तंत्रज्ञान आणि धार्मिक परंपरेचा सुंदर संगम यानिमित्ताने अनुभवता आला.
या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते श्री तुळजाभवानी देवींचे पूजन करून करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे, सौमय्याश्री पुजार, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, तेरखेडा फटाका असोसिएशनचे अध्यक्ष फरीद पठाण, अलियाज दारूवाले, तय्यब हुसेन दारूवाले, मंदिर संस्थानचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
यापूर्वी श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सव २०२५ अंतर्गत २९ सप्टेंबर रोजी हा ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता. मात्र, सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव तो स्थगित करावा लागला होता. अखेर शाकंभरी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत आज श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर हा ड्रोन शो यशस्वीपणे पार पडला.
या भव्य ड्रोन शोमध्ये तब्बल ३०० ड्रोनच्या सहाय्याने आकाशात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रतिकृती साकारण्यात आल्या. यामध्ये श्री तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती, श्री तुळजाभवानी देवींची दिव्य प्रतिकृती, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर आकर्षक प्रतिकृतीचा समावेश होता. विशेषतः आकाशात साकारलेल्या श्री तुळजाभवानी देवींच्या तेजस्वी प्रतिकृतीने भारावून टाकले. देवीच्या प्रतिकृतीसोबत प्रकाशयोजना आणि संगीतमय पार्श्वभूमीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला.
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती आकाशात साकारताच उपस्थित भाविकांमधून ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा जयघोष करण्यात आला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नियोजित प्रकाशयोजना आणि संगीताच्या सुसंवादामुळे हा ड्रोन शो भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला. देवीच्या दर्शनासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी यानिमित्ताने भाविकांना मिळाली.
धाराशिव जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा ड्रोन शो आयोजित करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. अनेक भाविकांनी हा सोहळा आपल्या मोबाईलमध्ये कैद करत आठवणी जपल्या.
ड्रोन शोच्या सादरीकरणानंतर तेरखेडा फटाका असोसिएशनच्या वतीने आकाशात नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. फटाक्याच्या रंगीबेरंगी रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला आणि शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या उत्सवात अधिकच भर पडली. एकूणच, श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित हा ड्रोन शो भक्ती, परंपरा आणि आधुनिकतेचा अद्भुत संगम ठरला असून, भाविकांच्या स्मरणात दीर्घकाळ राहणारा सोहळा ठरला आहे.












