धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील ज्येष्ठ डॉक्टर राधाकिसन कुंजुलालजी भन्साळी यांचे गुरुवारी २८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री उशिरा वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. तिरुमला तिरुपती येथील दसरा महोत्सवात त्यांनी अनेक वर्षे विनामूल्य वैद्यकीय सेवा दिली होती. शहरातील सुप्रसिद्ध रोटरी नेत्र रुग्णालयाच्या उभारणीतही त्यांची कामगिरी मोलाची ठरली होती.
डॉ भन्साळी हे केवळ एक डॉक्टर नव्हते तर एक चालते बोलते सामाजिक केंद्र होते. त्यांचा रोखठोक पण मनमिळाऊ स्वभाव, प्रचंड जनसंपर्क, अचूक रोगनिदान आणि अत्यल्प खर्चात रुग्णांवर उपचार करण्याची पद्धत यामुळे ते सर्वसामान्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या याच गुणांमुळे अनेक महत्त्वाची पदे त्यांच्याकडे चालून आली आणि त्या पदांवरही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला.धाराशिव येथील बालाजी मंदिराच्या पुनर्निर्माण आणि पुनर्स्थापना कार्यात त्यांनी बजावलेली सेवा अविस्मरणीय आहे.
त्यांच्या पश्चात नारायण व श्रीकिसन हे दोन धाकटे बंधू आणि मोठा भन्साळी परिवार आहे. एका सेवाभावी व्यक्तिमत्वाच्या जाण्याने शहराच्या सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.