धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असुन सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आकडेवारी पहिली तर डॉ साहेब अशी ओळख असलेले माजी मंत्री डॉ पद्मसिंह पाटील हे राजकारणातील ‘सिंह’ ठरले. पद्मसिंह पाटील हे धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक 7 वेळेस आमदार म्हणुन निवडुन आले तर सर्वाधिक 37 हजार 939 मतांनी विजयी होण्याचा विक्रम आजवर डॉ पाटील यांच्या नावावर असुन धाराशिव जिल्ह्यातील एकाही नेत्याला मोडता आला नाही तर सर्वात कमी 484 मतांनी निवडून येण्याची नोंदही डॉ पाटील यांच्या नावावर आहे, हे विशेष.
धाराशिव जिल्ह्यात सर्वच्या सर्व चारही मतदार संघात एखाद्या घराण्याची किंवा पक्षाची सत्ता असल्याचे आजवरचे चित्र आहे. बोटावर मोजणार्या निवडणूका व अपवाद सोडले तर विधानसभा निवडणुकीत परिवर्तन झाल्याचे दिसत नाही. डॉ पाटील, चव्हाण व मोटे परिवाराच्या घरात कायम आमदारकी राहिली, त्यांच्या सत्ता साम्राज्याला प्रा डॉ तानाजीराव सावंत व कैलास पाटील यांनी विजय मिळवीत सुरुंग लावला.
धाराशिव विधानसभा मतदार हा डॉ पद्मसिंह पाटील यांचा बालेकिल्ला राहिला. जातो.जिल्ह्यात ते सर्वाधिक 7 वेळेस आमदार म्हणून निवडून आले . 2009 ची निवडणूक वगळता त्यांच्या सत्ता साम्राज्याला एकाही नेत्याने किंवा पक्षाने सुरुंग लावलेला नाही. डॉ पद्मसिंह पाटील यांनी मीच ‘किंग’ आहे हे नेहमी या मतदार संघातून दाखवून दिले आहे. विधानसभा निवडणुकीत ते उभे राहिल्यावर 2009 पर्यंत ते एकदाही पराभुत झाले नाही.
1978 साली डॉ पद्मसिंह पाटील पहिल्यांदा काँग्रेस अर्स पक्षाकडून आमदार झाले आणि त्यानंतर त्यांची विजयी घोडदौड 2009 च्या निवडणुकीपर्यंत सुरूच राहिली. 1978, 1980, 1985, 1990, 1995, 1999, 2004 असे सलग 7 वेळेस ते आमदार राहिले, या काळात अनेक राजकीय परिवर्तन झाले मात्र त्यांनी शरद पवार यांची कायम साथ दिली. 1995 च्या निवडणुकीत डॉ पाटील यांनी सर्वाधिक जास्त मतांच्या फरकाने विजयी होण्याचा विक्रम केला, त्यांनी 1995 साली 37 हजार 939 मतांनी विजय मिळवला. त्यावेळी ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडुन उभे होते त्यांना 62 हजार 555 मते पडली तर प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार वसंतराव काळे यांना 24 हजार 616 मते पडली. 2004 च्या निवडणुकीत डॉ पाटील हे त्यांचे एकेकाळचे सहकारी कै पवनराजे निंबाळकर यांच्याशी झालेल्या काट्याच्या लढतीत 484 मतांनी निवडून आले होते.पद्मसिंह पाटील हे राष्ट्रवादीकडुन उभे होते त्यांना 68 हजार 883 मते पडली तर कै पवनराजे निंबाळकर यांना अपक्ष उभे राहून 68 हजार 350 मते पडली.
2009 च्या विधानसभा निवडणुकीत डॉ पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा ओमराजे निंबाळकर यांनी पराभव केला मात्र राणाजगजीतसिंह यांनी त्याचा वचपा 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काढला. डॉ पाटील यांच्याकडे 31 वर्ष तर राणांकडे 10 वर्ष अशी 41 वर्ष पाटील परिवारात आमदारकी आहे. 2009 साली डॉ पाटील हे लोकसभेला 6 हजार 787 मतांनी निवडून आले व राज्याच्या राजकारणातून केंद्राच्या राजकारणात गेले, त्यानंतर 2014 च्या लोकसभेला 2 लाख 34 हजार 325 मतांनी पराभुत झाले. सध्या डॉ पाटील हे सक्रीय राजकारणापासुन लांब असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे जनसेवेचे कार्य करीत आहेत.