धाराशिव – समय सारथी
राज्याच्या कृषी आयुक्तपदी डॉ प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेमणूकीचे स्वागत व अभिनंदन केले जात असुन त्यांच्या नियुक्तीने कृषी विभागाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे, त्यांनी त्यांच्या कार्यातून व निर्णयाने जनमाणसाच्या मनात आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
डॉ प्रवीण गेडाम यांनी हार्वर्ड विद्यापीठातून मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर) पदवी प्राप्त केली. गेली काही वर्षांपासून ते शैक्षणिक सुट्टीवर होते मात्र ते या यशानंतर पुन्हा प्रशासकीय सेवेत रुजु झाले होते आता ते कृषी आयुक्त म्हणून रुजू झाले आहेत.राज्यात गेली दीड दशकापासुन डॉ गेडाम हे लोकउपयोगी कामाने प्रसिद्ध असुन एक दबंग अधिकारी अशी ओळख सर्वदूर आहे.
धाराशिव येथे जिल्हाधिकारी असताना डॉ गेडाम यांनी अमूलाग्र बदल करीत निर्णय घेतले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दरबारात त्यावेळी झालेला सिंहासन पेटीतील सोने चांदी अपहार हा केवळ डॉ गेडाम यांच्यामुळे तो उघड झाला त्यानंतर सीआयडीने गुन्हा नोंद केला.तुळजाभवानी देवस्थानच्या मालकीची जमीन परत घेणे, रेशन माफियासह भुमाफियावर डॉ गेडाम यांनी अहवाल अहवाल सादर केल्याने फौजदारी गुन्हे दाखल झाले व कारवाई झाली. तत्कालीन माजी मंत्री सुरेश जैन यांचा घरकुल घोटाळा डॉ गेडाम यांच्यामुळे बाहेर आला त्यानंतर त्यांच्यासह अनेकांना जेलवारी झाली.
सोलापूर येथे सुद्धा डॉ गेडाम यांनी चुणूक दाखवत वाळू माफिया, भुमाफिया यांची नाकेबंदी केली होती.
डॉ गेडाम हे मुळ नागपूरचे असुन 2002 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. गेडाम यांनी दापोली मध्ये प्रांतअधिकारी, जळगाव महापालिकेत आयुक्त, लातूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, धाराशिवचे जिल्हाधिकारी, पुणे येथे भुजल विकास यंत्रणेचे संचालक, सोलापूर जिल्हाधिकारी, नाशिक महापालिका आयुक्त, परिवहन आयुक्त,केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे स्वीय सहायक आणि केंद्रीय आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण या ठिकाणी काम केले होते आता ते राज्याचे कृषी आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत.