धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ड्रग्ज, धाराशिव शहरातील कचरा व जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगितीच्या मुद्यावरून भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात घमासान पहायला मिळाले, यावेळी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी उत्तम समन्व्य साधला. निधी लॅपस होणार नाही, धाराशिवच्या जनतेवर अन्याय होऊ देणार नाही असे ते म्हणाले. झारीतला शुक्राचार्य कोण ? व का स्थगिती दिली हे लोकांना कळू द्या असे ओमराजे म्हणाले. सरकारने स्थगिती दिली आहे,ज्याला हौस आहे त्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विचारावे असा टोला लागवला. मी विकास करायला आलो आहे, विकासावर बोलु असा सबुरीचा सल्ला पालकमंत्री सरनाईक यांनी दिला. जर मी काही चुकीचे करीत असेल तर थेट मुख्यमंत्री यांना पत्र द्या,पालकमंत्री बदला असे सुचक वक्तव्य करीत हात जोडून विनंती केली की राजकारण करू नका.
राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली, यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, आमदार स्वामी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष, पोलिस अधीक्षक संजय जाधव व इतर अधिकारी, समिती सदस्य उपस्थितीत होते. आमदार स्वामी उशीरा आल्याबद्दल त्यांचे स्वागत करा असा खोचक टोला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लागवला.
आपण पालकमंत्री आहेत, निधी स्थगितीतील झारीतला शुक्राचार्य कोण आहे हे शोधा व आम्हाला सर्व लोकांना कळू द्या, कोण स्थगिती व का दिली. तुम्ही मंजुर केलेल्या कामांना तुम्ही स्थगिती का दिली हे स्पष्ट करावे अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली केली त्यावर पालकमंत्री म्हणाले की निधी लॅपस होणार नाही याची काळजी घेऊ. कामासाठी लागणारे सिमेंट पोते व इतर खर्च वाढतो त्यामुळे योजनेचे बजेट वाढते, कोणाच्या सांगण्यावरून हे थांबवले,स्थगिती दिली असा सवाल ओमराजे यांनी केला. नियोजन समितीच्या बैठकीत सगळ्यांनी एकत्र निर्णय घेतला मग स्थगिती का, काही कामे उन्हाळ्यात होणे गरजेचे आहे. अनुसूचित घटक कामांना, दलित वस्ती कामे यांना स्थगिती लागु होत नाही मात्र ती कामे थांबली असल्याचे आमदार कैलास पाटील म्हणाले. सामान्य लोकांनी काय घोडे मारले, ज्या अधिकारी यांनी विनाकारण कामे थांबवली असतील त्याच्या पगारीतुन अधिकचा होणारा खर्च वसुल करा असे ओमराजे म्हणाले. ज्या कामांना स्थगिती नाही ती येत्या 8 दिवसात पूर्तता व तात्काळ पावसाळ्यापुर्वी कामे सुरु करा असे आदेश पालकमंत्री म्हणाले.
1 एप्रिल 2025 पर्यंत 250 कोटीच्या कामाच्या वर्क ऑर्डर झाल्या नाहीत. काही जणांनी अधिकारी यांच्यावर दबाव आणला गेला असा आरोप आमदार राणाजगजीत पाटील यांनी केला, अधिकारी यांनी कोणी मोठ्या आवाजात बोलले तरी घाबरू नये असे म्हणाले. त्यावर ओमराजे म्हणाले की दबाव कोण आणला याची चौकशी होऊ द्या. तुळजापूर ड्रग्ज, धाराशिव कचरा व रस्त्याच्या विषयावर काही जणांनी राजकारण केले असा आरोप नाव न घेता केला, मी आज इथे जास्त बोलणार नाही, राजकीय आखाडे वेगळे आहेत. योग्य वेळी ते पाहू, ज्यांना हौस आहे त्यांनी स्थगितीबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना जाऊन विचारावे असा सल्ला खासदार ओमराजे यांना नाव न घेता दिला.
विनाकारण 250 कोटी कामे स्थगित केली आहेत, पुन्हा 5 वर्षाने जनेतेच्या दरबारात जायचे आहे. तुम्ही पालकमंत्री आहेत की नाहीत, शासनाचा भाग आहेत की नाही असा सवाल ओमराजे यांनी केला. पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, बैठकीत या सगळ्या चर्चा होणार होत्या हे अपेक्षित होते. शासनाने हे थांबवले आहे, रद्द केले नाही, निधी लॅपस होणार नाही याची ग्वाही पालकमंत्री सरनाईक यांनी दिली. मी जिल्ह्याचा विकास करायला आलो आहे, जिल्हा विकासाच्या वेगळ्या पातळीवर न्ह्यायचा आहे. मी काही चुकीचे करीत असेल तर थेट मुख्यमंत्री यांना पत्र द्या,पालकमंत्री बदला असे सुचक वक्तव्य करीत हात जोडून विनंती करतो राजकारण करू नका असे पालकमंत्री म्हणाले.
निधी वाटप सर्वानुमते घडले आहे, त्यात काही चुकीचे नाही असे मी मुख्यमंत्री यांना सांगितले आहे. मी वस्तुस्तिथी नाकारता नाही,लोकांचे हाल होत आहेत मात्र धाराशिवच्या जनतेवर अन्याय होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा असे पालकमंत्री म्हणाले. आपण सगळे लोकप्रतिनिधी एकत्र येऊन विकास, चांगल्या कामासाठी काम करू, विकासावर बोलु असे ते म्हणाले. इतरांपेक्षा अधिकचा निधी मिळेल यासाठी मी कटीबद्ध आहे. आम्ही सत्तेत असताना आम्ही कधी स्थगिती आणली नाही, कर्म सगळ्यात मोठे असते, मी कर्माला मानणारा माणुस ज्याने केले आहे त्याला भोगावे लागेल असे ओमराजे म्हणाले. पक्षाअंतर्गत व इतर कुरघोडी व्हाव्यात यासाठी मी आलो नाही, मी विकासासाठी आलो आहे असे पालकमंत्री म्हणाले.
नियोजन समिती कामाबाबत गंभीर आरोप माहिती आली आहे ती जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊन चौकशी करायची आहे, हे ठरले असल्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले. निधी वाटपात टक्केवारी घेत असल्याच्या निरर्थक बातम्या काही पत्रकार यांनी दिल्या किमान पालकमंत्री म्हणुन मला विचारा असे ते म्हणाले. अश्याने वातावरण दुषित होते, बातमी देण्यापुर्वी खात्री करा असे म्हणत सर्वांनी एकत्र येत विकास करू, धाराशिव सक्षम बनवू असे पालकमंत्री म्हणाले.