धाराशिव – समय सारथी
जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देऊन कुरघोडीचे राजकारण करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक अत्यंत प्रामाणिक काम करणारे मंत्री असून,त्यांची महायुतीच्या नेत्यांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून बदनामी सुरू आहे. त्यांच्या बद्दलच्या अफवा, चर्चा थांबवा अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले जाईल,असा इशारा शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत पाटील यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. जिल्हा नियोजन समितीच्या कामांना देण्यात आलेल्या स्थिगितीच्या पार्श्वभूमीवर सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, महायुतीच्या काही नेत्यांनी पडद्यामागून पालकमंत्र्यांची बदनामी सुरू केली असून,त्यांच्यावर घाणेरडे आरोप केले जात आहे. असे प्रकार सुरूच राहिल्यास आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सोबत राहायचे की नाही,हे ठरवावे लागेल. जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पालकमंत्री बदलण्याचे डाव असतील तर हे खपवून घेतले जाणार नाही. महायुतीतील सर्वच तिन्ही पक्ष मीच चालवतो, मी काहीही करू शकतो, पालकमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना अडवू शकतो, अशी तुळजापूरच्या लोकप्रतिनिधींची धारणा त्यांची झाली आहे. अशा अनेक घटना घडत आहेत.
लोकप्रतिनिधींना निधी वाटप करण्याचे सूत्र वरिष्ठ स्तरावरून ठरलेले असताना अडवणूक कशासाठी का केली जात आहे, असा सवाल करून निधी अडवण्याचा कुणालाही अधिकार नाही. पालकमंत्र्यांची बदनामी सहन केली जाणार नाही, जिल्हा नियोजन समितीच्या कामात टक्केवारी वगैरे काहीही नाही.केवळ बदनामीपोठी हा प्रकार सुरू आहे.खालच्या खाली हे प्रकार सुरू आहेत. पालकमंत्री आणि त्यांच्या स्वीय सहायक यांच्याशी माझे बोलणे झाले आहे.त्यांनी असे प्रकार खपवून घेणार नाही, असे सांगितले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या कामावरील स्थगिती उठवावी, 21 तारखेपूर्वी शासनाने निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा स्व.बाळासाहेबांच्या विचाराचे सर्व शिवसैनिक आंदोलनात उतरतील आणि 21 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू होईल, असा इशारा सुधीर पाटील यांनी दिला. यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.