धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे वार्ताकन करण्यासाठी आलेल्या पत्रकार यांना हाकलून देण्यात आले. एका लोकप्रतिनिधीने जिल्हाधिकारी यांच्या कानात सांगितल्यानंतर पालकमंत्री सावंत यांच्या संमतीने पत्रकार यांना बाहेर काढण्यात आले त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी याबाबतचा खुलासा जाहीर केला आहे. माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्याचे म्हणटले आहे.
पत्रकार यांना बाहेर काढताना एकाही लोकप्रतिनिधी यांनी पत्रकार यांची बाजु घेतली नाही किंवा बाहेर काढू नये असे सांगितले नाही. पालकमंत्री सावंत यांच्या खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार राणाजगजीतसिंह पाटील,आमदार कैलास पाटील,आमदार विक्रम काळे या सर्व जणांनी एकोपा दाखवत, मतभेद बाजूला ठेवले व त्या क्षणाची मजा घेतली.
जिल्हा नियोजन समिती ही संविधानिक समिती आहे, या समितीच्या बैठकांना माध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्यास 9 जून 2005 च्या राज्य शासनाच्या अर्धशासकीय पत्राद्वारे मनाई आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती माध्यमांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना व्हावी म्हणून या बैठकीनंतर एखादे बातमीपत्र प्रसिद्ध करण्यास किंवा पत्रकार परिषद बोलवून महत्त्वाच्या निर्णयांना प्रसिद्धी देण्यास हरकत नाही. याबाबत 9 जून 2005 च्या अर्ध शासकीय पत्राद्वारे सर्व पालकमंत्री तथा अध्यक्ष,जिल्हा नियोजन समिती यांना कळविण्यात आले होते.
जिल्हा नियोजन समिती, धाराशिवच्या 16 ऑक्टोबर 2023 रोजीच्या बैठकीस माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याबाबत उपस्थित कोणत्याही लोकप्रतिनिधींनी सांगितलेले नाही.माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर ही बाब पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली. बैठकीला उपस्थितीत राहायचे असल्यास माध्यम प्रतिनिधी यांच्या लेखी निवेदनानंतर पालकमंत्री यांची मान्यता घेणार असल्याचे कळविले आहे.