विरोधी आमदार व खासदारांना निधीत ‘ठेंगा’, राजकारण तापणार
धाराशिव – समय सारथी
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणारी धाराशिव जिल्हा नियोजन समितीचे बैठक अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. अपरिहार्यता नेमकी काय हे कळू शकले नाही.
30-30-40 असे निधी वाटपाचे सूत्र ठरण्याची सूत्रांची माहिती आहे. 30 टक्के निधी सत्तेतील आमदार राणाजगजीतसिंह पाटील व प्रा डॉ तानाजीराव सावंत यांना तर उर्वरित 40 टक्के निधी हा पालकमंत्री यांना देण्याचे ठरले असल्याचे कळते. विरोधी 2 आमदार व खासदार यांना एकही रुपयांचा निधी देण्यात येणार नसून त्यांना निधीत ‘ठेंगा’ दाखवला जाणार आहे. समसमान निधी वाटप न झाल्यास हे प्रकरण कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यात सकारात्मक बैठक काम वाटपाचे सूत्र ठरल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले असले तरी मागील आर्थिक वर्षातील निधीची स्थगिती अधिकृत रित्या अजून उठवलेली नाही त्यामुळे पद्यामागे काय सुरु आहे याची चर्चा रंगली आहे, त्यातच 15 ऑगस्टची बैठक रद्द करण्यात आल्याने निधीचे भिजत घोंगडे राहणार आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरु होऊन 4 महिने झाले असून 2025-26 या चालू आर्थिक वर्षासाठी 457 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता मिळालेली आहे.
यापूर्वीच्या पालकमंत्री यांच्या काळात एकूण निधीच्या 15 टक्के प्रमाणे 30 टक्के कामे सत्ताधारी आमदारांना, 2 विरोधी पक्षाचे आमदार व खासदार यांना प्रत्येकी 10 टक्के असे 30 टक्के व शिल्लक 40 टक्के निधी हा पालकमंत्री यांना दिला जात होता मात्र ते सूत्र व गणित आता बदलण्याचा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा ‘हट्ट’ आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली असुन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी याबाबतचे आदेश काढले होते. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी तक्रार केल्यानंतर ही स्थगिती देण्यात आली, त्यांनी नात्याने काका असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार केली व स्थगिती द्यावी असे विनंती देणारे पत्र पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांना द्यायला भाग पाडले.