धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या विविध विकास कामांना स्थगिती मिळाली असुन जिल्ह्याचा चालक मालक कोण ? यावरून वाद आहे. एकूण निधीच्या 15 टक्के प्रमाणे 30 टक्के कामे सत्ताधारी आमदारांना, 2 विरोधी पक्षाचे आमदार व खासदार यांना प्रत्येकी 10 टक्के असे 30 टक्के व शिल्लक 40 टक्के निधी हा पालकमंत्री यांना असे निधी वाटप सुत्र ठरल्याची माहिती आहे. पालकमंत्री यांनी त्यांच्या कोट्यातील काही कामे मर्जीनुसार द्यावी यावरून वाद सुरु आहे. पालकमंत्री परजिल्ह्यातील बाहेरील आहेत, त्यांना पुरेशी माहिती नाही त्यामुळे त्यांनी सांगेल तिथे निधी द्यावा असा हट्ट आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली असुन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी नियोजन समितीच्या काम वाटपावर आक्षेप घेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांची तक्रार केल्याचे कळते, त्यानुसार मुख्यमंत्री यांनी पालकमंत्री यांच्याकडून 26 मार्चला एक निवेदन घेतले व त्यावर स्थागिती दिली. कार्यारंभ आदेश न झालेल्या मंजूर सर्व कामांना स्थगिती देण्यात येत असल्यासंदर्भात आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.
जिल्हा नियोजन समितीचच्या कामांना स्थगिती दिल्याने सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे. या कामांना मंजुरीचा मुहूर्त कधी लागतो हे पाहावे लागेल. यापुर्वीही आमदार पाटील यांनी तत्कालीन पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची जिल्हा नियोजन समिती निधी वाटपावरून तक्रार केली होती.