धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना भाजप युतीच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. आमदार सावंत वगळता शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा महायुतीचा सुर आहे तर शिवसैनिक मात्र पुर्व अनुभव पाहता भाजप विरोधी भूमिकेत आहेत. ‘आयात’ नेत्यामुळे शिवसेना पक्षाला ‘वाळवी’ लागली असुन स्वार्थी राजकारणासाठी पक्ष भाजपच्या दावणीला बांधला. शिवसेना व शिवसैनिक म्हणुन असलेला सन्मान धुळीस मिळवला अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
धाराशिव नगर परिषद निवडणुकीत चर्चेत गुंतवून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देऊ दिला नाही, एकही नगरसेवक निवडणुन न आल्याने भोपळा मिळाला. भुम व परंडा येथे शिवसेना अर्थात आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या विरोधात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह सगळे राजकीय पक्ष एकत्र आले. सावंत यांचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी काहींनी रसद देखील पुरवली. उमरगा येथे शिवसेना काँग्रेस एकत्र लढले, तिथे भाजपने विरोध केला. भुम, परंडा, उमरगा विजय मिळवला की शिवसेना व महायुतीचा डंका पिटवला व श्रेय घेतले.
नप निवडणुकीत इतके अनुभव असतानाही जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आमदार, स्थानिक नेते यांना विश्वासात न घेता काहींनी भाजप सोबत युतीची बोलणी केली. स्थानिक नेत्यांना ‘किरकोळ’ स्थान देत नेत्यांनी मुंबईत बोलणी व जागा वाटप अंतीम केली. अवहेलना, अपमान, सन्मान नसेल तर सत्तेचे काय मूल्य असे म्हणत शिवसैनिक नाराज आहेत. पक्ष दावणीला बांधायचा सुपारी घेऊन कार्यक्रम काही ठिकाणी सुरु असल्याचा शिवसैनिक यांचा आरोप आहे.
आमदार तानाजीराव सावंत यांनी तर ढोकी येथील जाहीर सभेत आमदार पाटील हे 5 पक्ष चालवीत असल्याचा आरोप केला होता. भाजपने धोका दिला, फसवले असा जाहीर आरोप काही पदाधिकारी यांनी नप निवडणुकीत केला होता मात्र नंतर त्यांच्या त्यांच्याच नेत्याकडुन मुसक्या आवळण्यात आल्या. पक्ष वाढीसाठी नेमणूक केलेल्या नेत्यांनी उलट घात केला असाही सुर आहे. काही ‘लाचार’ नेते पुन्हा त्याच दावणीला बांधले गेले असे म्हणत कोटींच्या उड्डानाची योग्य वेळी पोलखोल करण्याचा इशारा काही शिवसैनिकांनी दिला.
नगर परिषद निवडणुकी प्रमाणेच पक्षाचे एबी फॉर्म हे शिवसेना संपर्क प्रमुख राजन साळवी यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा वाटप, फॉर्म व या सर्व प्रक्रियेत साळवी यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे. पक्षाला विचारल्या शिवाय व परवानगी घेतल्या शिवाय शिवसेना पक्षाकडुन उमेदवारी अर्ज भरू नका अशी तंबी काही नेत्यांनी इच्छुक व पदाधिकारी यांना दिली असल्याची सूत्रांची माहिती आहे. उघडपणे बोलणाऱ्या काही पदाधिकारी यांचा बंदोबस्त करण्यासाठी पक्ष संघटनात्मक बदल करण्याची ‘सुपारी’ दिल्याची चर्चा असुन त्या प्रमाणे ‘नियोजन’ सुरु आहे.
आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत हे सोमवार 19 जानेवारी पासून 3 दिवसांच्या दौऱ्यावर असुन त्यांनी इच्छुक उमेदवार यांच्या मुलाखती व बैठका आयोजित केल्या आहेत तर पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व संपर्क प्रमुख राजन साळवी हे 20 जानेवारी रोजी मंगळवारी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. सोमवारी भाजप सेनेच्या काही नेत्यांची जागा वाटप बोलणी होणार असुन त्यानंतर बऱ्यापैकी चित्र उघड होईल अशी शक्यता आहे.
21 जानेवारी बुधवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतीम दिवस आहे तर 27 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. शिवसेना,भाजपसह अन्य पक्ष सर्व जागावर उमेदवारी अर्ज भरून नंतर महायुती व महाविकास आघाडीची चर्चा करणार की त्यापूर्वीच सगळं अंतीम करणार हे पाहावे लागेल. धाराशिव नप निवडणुकीत भाजपने उमेदवारीचे पत्ते शेवट पर्यंत उघड केले नव्हते.












