धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी भाजपा पुर्ण ताकतीने मैदानात उतरली असुन वेगवेगळ्या आघाडीवर मोर्चेबांधणी केली जात आहे. भाजप शिवसेना युतीच्या नावाखाली कळंब, तुळजापूर व धाराशिव तालुक्यातील 29 जागा भाजपच्या टार्गेटवर आहेत. या 3 तालुक्यात शिवसेनेला 3 जागा देऊन शह देण्याचा डाव आखला आहे. आमदार सावंत यांची भुम परंडा वाशी मतदार संघात कोंडी करायचा प्लॅन असुन सोईनुसार युतीचे कार्ड मागे पुढे केले जात आहे.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर विराजमान करायचे असल्याने ‘मिशन जिल्हा परिषद’ विशेष महत्वाचे आहे. पत्नीला सत्तेच्या पदावर बसवण्यासाठी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी यापुर्वी देखील अनेकदा प्रयत्न केले आहेत. लोकसभेला तर थेट राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले मात्र तिथे अपयश आले त्यानंतर मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे वेध लागले आहेत त्यासाठी यावेळी भाजप पक्ष म्हणुन एक माध्यम आहे. सस्पेन्स कायम राहावा यासाठी अर्चना पाटील यांनी केशेगाव व तेर गटातून अर्ज दाखल केले.
धाराशिव जिल्हा परिषदेत 55 जागा असुन त्यातील 3 तालुक्यातील 29 जागा महायुती म्हणुन भाजपणे लढायच्या, 2-3 जागा शिवसेनेला देऊन खुश करायचे. एकहाती सत्तेच्या मार्गावर सावंत हे अडथळा ठरत असल्याने त्यांची भुम परंडा वाशी तालुक्यात कोंडी करण्याची रचना आहे. सावंत विरोधात सगळे एकत्र करून 13 जागावर लढायचे व त्यातूनही सावंत जागा आल्या तर त्यावर महायुतीचे लेबल लावायचे असाच प्रकार आहे.
शिवसेनेच्या काही नेत्यांना हाताशी धरून शिवसेना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या दावणीला बांधली असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. 3 तालुक्यातील शिवसैनिक हतबल झाले असुन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयावर दिशा ठरणार आहे. आमदार सावंत यांनी शिंदेसह पालकमंत्री यांना फोन लावुन भावना कळवल्या तर जिल्ह्यातील काही नेत्यांना खडेबोल सुनावले. तुमचा काही राग असेल तर माझ्यावर काढा मात्र शिवसेना, शिवसैनिक यांचे नुकसान करू नका. उद्या 21 जानेवारी उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने शिवसेना किती जणांना एबी फ्रॉम देते हे कळणार असुन चित्र स्पष्ट होणार आहे.











