भाजपकडुन पण होते इच्छुक, ‘यांच्या’ पासुन मिळाली प्रेरणा, रोजगाराला प्राधान्य – धाराशिवचं सत्ताकारण
धाराशिव – समय सारथी
पुणे येथील गजा मारणे टोळीचा शार्प शुटर व उजवा हात अशी गुन्हेगारी जगतात ओळख असलेल्या सुनील बनसोडे याला धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाकडुन उमेदवारी मिळाली आहे. धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यादाच गुन्हेगारी टोळीतील एखाद्याला उमेदवारी मिळाली असुन पाठबळ व राजाश्रय मिळत आहे. उमेदवारीला शिफारस, निकष व पाठबळ कोणाचे असा प्रश्न विचारला जात आहे.
भाजपकडुनही उमेदवारी मागितली होती मात्र शिवसेनेकडुन मिळाली आहे. बनसोडे यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यातील कोणते नेते सभा घेतात व त्या सभेत कोणते विकासाचे व्हिजन मांडतात याकडे लक्ष लागले, महायुतीने रसद पुरवीत शक्तीपणाला लागली आहे. शहापुर एकमेव गट मिळाल्याने बनसोडे हा या निवडणुकीत शिवसेनेचा तुळजापूर तालुक्याचा चेहरा असणार आहेत.
तुळजापूर तालुक्यातील शहापुर जिल्हा परिषद गटातून सुनील बनसोडे याला शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. बनसोडे याच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद असुन मकोका सारखी कारवाई सुद्धा झाली आहे. विकास व बेरोजगारी हटवून तरुणांना उद्योग देण्याचे बनसोडे याचे व्हिजन आहे, असे बनसोडे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हण्टले आहे.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी तुळजापूर मतदार संघात केलेल्या विकासाच्या प्रेमात बनसोडे पडले असुन चांगलेच भारावले आहेत. केंद्रात, राज्यात जे आहे ते जिल्ह्यात व्हावे हा अजेंडा त्यांचा आहे. राणाजगजीतसिंह पाटील यांच्या माध्यमातून निधी आला, पीक विम्याचा, शेती, आरोग्य प्रश्न सुटले व मी त्याचे काम बघून भावनिक झालो आणि निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला. आमदारांच्या नेतृत्वावर विश्वासू ठेवून भाजपकडुन उमेदवारी अर्ज दाखल केला असे ते म्हणाले. एकंदरीत त्यांना आमदारांपासुन विकासाची ‘प्रेरणा’ मिळाली असल्याचे दिसते.
शहापुर जिल्हा परिषद गटात उमेदवारी देताना शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विश्वासानत घेण्यात आले नाही असा शिवसैनिक यांचा आरोप आहे. अनेक पदाधिकारी यांना तर ते कोण आहेत ते माहिती नाही. भाजप सेना नेत्यात ठरले व उमेदवारी दिली इतकीच ती माहिती आहे. शिवसेनेला इथे मतदार संघ गटातील दुसरा ‘सक्षम’ उमेदवार मिळाला नाही हे विशेष. या गटात अशोक जाधव राष्ट्रवादी शरद पवार गट, कचरू सगट शिवसेना उबाठा गट, लिंगय्या स्वामी हे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या गटात अनेक रंजक बाबी समोर येणार आहेत.












