धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत अर्चना राणाजगजीतसिंह पाटील ह्या निवडणुकीच्या रिंगणात असणार असुन त्या तेर गटातून निवडणुक लढणार आहेत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अर्चना पाटील यांनी केशेगाव गटातून माघार घेतली आहे. भाजपाने ए फॉर्म दिलेल्या जया नवनाथ नाईकवाडी यांनी माघार घेतल्याने अर्चना पाटील ह्या तेर गटातून भाजपाच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. या राजकीय घटनाक्रमानंतर प्रसार माध्यमाशी काहीही न बोलता त्या निघुन गेल्या.
नाईकवाडी यांना पक्षाने उमेदवारी दिली होती मात्र त्यांना ‘राजहट्टा’ पोटी मागे घेण्यासाठी भाग पाडले गेले व अर्चना पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले गेले. उमेदवारीसाठी अर्चना पाटील ह्या आडून बसल्या होत्या, अखेर त्यांना पक्षीय पातळीवर सर्व संकटावर मात करीत उमेदवारी मिळवण्यात यश आले.
मल्हार पाटील यांनी अर्चना पाटील ह्या निवडणुक लढविणार नाहीत अशी माहिती दिली होती, मात्र ती राजकीय ‘डावपेच’चा भाग ठरली. सामान्य कार्यकर्ते यांना संधी, न्याय हा ‘गाव गप्पा’ ठरल्या, उलट गळचेपी करत माघार घ्यायला लागवली असे बोलले जात आहे. ‘त्यागमुर्ती’ ना सत्तेचा मोह न आवरल्याने व विकासाचा गोंडस ‘साक्षात्कार’ झाल्याने त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत असे बोलले जात आहे.
भाजप पक्षाच्या उमेदवाराने अर्ज काढुन बी ला मिळणे असे धाराशिवच्या राजकारणात कदाचित असे पहिल्यांदा घडले असावे. ‘माऊली’ म्हणत आमदार राणाजगजीतसिंह पाटील समर्थक यांनी अर्चना यांना अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणुन जाहीर केले आहे. घराणेशाहीसह अन्य मुद्यावर या मतदार संघात आता रंगत येणार आहे.
निवडणुक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार मृणाल जाधव यांच्याकडे अर्चना पाटील यांनी केशेगाव येथील उमेदवारी मागे घेतल्याचा अर्ज दिला. यावेळी भाजप जिल्हा प्रवक्ते ऍड नितीन भोसले, गणेश भातलवंडे उपस्थितीत होते.












