धाराशिव – समय सारथी
एकीकडे धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी यांचे संसार उघड्यावर आले असताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव हे दोघे तुळजापुर नवरात्र सांस्कृतिक उत्सवात एका गाण्यावर नाचत ठेका धरताना दिसले. पुरस्तिथी असताना संस्कृतीक कार्यक्रम सुरु असुन हा प्रकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, नाच गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असुन सर्व स्तरावर टीका होत आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून हा पैसा शेतकरी यांना द्यावा अशी मागणी होत आहे. अनेक शेतकरी उघड्यावर असताना हा महोत्सव सुरु आहे. ज्याच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी आहे त्यांच्याकडून हा प्रकार सुरु आहे. हा महोत्सव पुर्वनियोजित असला तरी काही घटना, शेतकरी यांचे दुःख याचे भान राखणे गरजेचे होते मात्र मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या पैशावर हे सगळं सुरु आहे. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
तब्बल 8 कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च करून तुळजापूर नवरात्र उत्सव सुरु आहे, तुळजाभवानी मंदीर संस्थानने हा उत्सव आयोजित केला आहे. यासाठी काही स्पॉन्सर व इतर निधी गोळा करण्यात आला असुन उर्वरीत खर्च हा मंदीर संस्थान करणार आहे.
तुळजाभवानी मंदीर संस्थान एरवी मदत करत असताना नियमावर बोटं ठेवते मात्र या सांस्कृतिक कार्यक्रमावर करोडो रुपये खर्च करताना दिसत आहे. मंदिराचा पैसा खर्च करताना धर्मादाय आयुक्ताची परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे शिवाय कोणत्या प्रयोजनासाठी खर्च करावा याचे नियम आहेत त्यामुळे आगामी काळात हा कळीचा मुद्दा ठरू शकतो.
धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजनुसार जिल्ह्यातील 2 लाख 26 हजार 706 हेक्टवरील पिके व फळबागांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. एक हजार 48 घरांची पडझड झाली असून 207 जनावरे मृत्यमुखी पडली आहेत. जिल्ह्यातील 363 गावांसह 1 लाख 98 हजार 375 शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने वेगाने हाती घेतले आहेत, 15 तलाव फुटले असुन 16 गावांचा संपर्क तुटल्याने 498 नागरिकांना सुरक्षित हलवण्यात आले आहे.