धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले असुन नाला, घाण, सांडपाणीच्या ठिकाणी भाजी पाला विकला जात असल्याने धाराशिवकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आठवडी बाजारात खुली जागा व कट्टे तयार करून दिलेले असतानाही भाजी फळ विक्रेते हे मुख्य रस्त्यावर येऊन गाडे लावुन भाजी विकत असल्याने वाहतुकीसला अडथळा निर्माण होत आहे, वाहतूक खोळंबल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. घाण पाहून भाजी पाला, फळे हे एक प्रकारे विषासमान ठरत आहेत.
धाराशिव हे जिल्ह्याचे ठिकाण असले तरी अशी दयनीय बिकट स्तिथी आहे. नगर परिषद निवडणुकीवेळी आठवडी बाजार येथे सुविधा, स्वच्छता ठेवू असे आश्वासन दिले अनेक स्वप्ने दाखवली मात्र सत्ता येताच त्याला विसर पडला आहे. सत्ता आल्यावर इथे फेरफटका सुद्धा मारला, रिल्स काढल्या मात्र स्तिथी जैसे थेच आहे. सत्ताधारी, विरोधक शांत असुन धाराशिवकर निमूटपणे इथे आठवडी बाजार करीत आहेत. सत्ताधारी, विरोधक यापैकी सत्ता कोणाचीही असो हे चित्र बदलले नाही, प्रशासक काळातही असेच होते.
आठवडी बाजारात नालीच्या कडेला भाजी पाला विक्री केली जाते. धाराशिवकर रोज जी ताजी व स्वच्छ आरोग्यवर्धक भाजी म्हणुन भाजी फळे खातात त्याला या भागातील घाणीचा ‘बुस्टर डोस’ मिळतो असेच म्हणाले लागेल. धाराशिवकरांच्या अन्नात रोज विष कालवण्याचे काम या घाणीमुळे होत असुन याला जबाबदार कोण ? याचा जाब विचारण्याची वेळ यानिमित्ताने आली आहे.
आठवडी बाजारात भाजी फळे विक्री करण्यासाठी जागा राखीव केली असुन तिथे सिमेंटचे कट्टे सुद्धा बांधले आहेत मात्र तिथे ठरवून दिलेल्या जागी भाजी न विकता विक्रेते रस्त्यावर भाजी फळे विकत असल्याने मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असुन अडथळा होत आहे. आतील बाजार मैदान मोकळे तर रस्त्यावर बाजार अशी स्तिथी आहे. रस्त्यावर फळ गाडे लावल्याने वाहन चालवणे अवघड जात असुन अपघाताचे व वादाचे प्रमाण वाढत आहे, यां भागातील हॉटेल, दुकानेसमोर भाजी विकली जात आहे. ठरवून दिलेल्या जागी बाजार भरल्यास रस्त्यावरची गर्दी कमी होऊ शकते मात्र नगर परिषदेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, इथे नियोजनाचा आभाव जाणवतो.
सांडपाणी, घाण ज्या नाल्यात जाते तिथे विक्रेते मिळेल ती जागा धरतात व भाजी पाला विक्री करतात, अनेक वेळा डुक्कर व इतर प्राणी तिथे असतात. काही ठिकाणी तर रस्त्यावर विक्रीसाठी मांडलेल्या भाजी, फळावर डुक्कर व इतर प्राणी ताव मारत ते खातात व तोच भाजी फळे लोकांना विकली जात असल्याचे व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. इथले विदारक दृश्य पाहिले तर भाजी फळे खाऊ वाटणार नाहीत मात्र पर्याय नसल्याने धाराशिवकर ती घेतात. हे असेच सुरु राहिले तर आजाराचे प्रमाण वाढू शकते, आठवडी बाजारात सुविधा मिळणे आवश्यक आहे.
आठवडी बाजार विकसित करण्यासाठी 5 कोटी व उद्यान यासाठी 7 अशी 12 कोटी रुपयांची कामे 3 नोव्हेंबर 21 व 11 एप्रिल 2022 रोजी मंजुर करण्यात आले होती मात्र या कामांना 8 ऑगस्ट व 20 सप्टेंबर 2022 च्या निर्णयानुसार स्थगिती देण्यात आली. महाविकास आघाडी सरकार असताना या विकास कामांना मंजुरी देण्यात आली मात्र त्यानंतर 30 जुन 2022 रोजी सत्ता परिवर्तन होऊन शिंदे फडणवीस सरकार आल्यावर या विकास निधीला जाणीवपूर्वक स्थगिती दिली हे वास्तव आहे. गेली 4 वर्षांपासुन हा विषय प्रलंबित असुन आरोप प्रत्यरोपाचे गुऱ्हाळ सुरु आहे.











