धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीने नदी, नाले ओढे पाण्याने ओसंडून वाहल्याने अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. सगळीकडे भीषण स्तिथी असताना तुळजापूर तालुक्यात मात्र एकाही शेतकऱ्याची जमीन खरडून गेली नाही असा प्रशासनाचा अहवाल आहे, तुळजापूर तालुक्यात बाधित शेतकरी, गावे व क्षेत्र हे शुन्य दाखवले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दिव्या खाली अंधार अशी टीका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली असुन याची जबाबदारी व अपयशाचे श्रेय आमदार राणाजगजीतसिंह पाटील घेणार का ? असा सवाल ओमराजे यांनी केला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, मला यात राजकारण करायचे किंवा आणायचे नाही मात्र आमदार पाटील यांची आकडेवारी, पंचनामे, प्रशासन काय करतंय यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती. ते यात अपयशी ठरले आहेत हे त्यांनी मान्य केले पाहिजे. मी याबाबत प्रशासनाशी बोललो असुन पंचनामे व आकडेवारी दुरुस्त केली जाईल शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
शासनाच्या कोणत्याही योजनेचे गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या कामाचे श्रेय आमदार राणाजगजीतसिंह पाटील घेतात, मात्र त्यांना त्यांच्या तालुक्यात काय सुरु आहे हेच माहिती नाही. देशाचा कारभार हाकण्याची जबाबदारी कदाचित त्यांच्यावर असावी व त्यांना प्रेस नोट, फेसबुक लाईव्ह करण्यातून वेळ मिळत नसावा असेही ओमराजे म्हणाले.
अनेक ठिकाणी रस्ते बंद होते, पुलावरून पाणी जात होते मग शेजारील जमीन खरडून गेली नाही का? शुन्य अहवाल धक्कादायक होता. काक्रबासह इतर भागातील काही शेतकरी यांची नावे, फोटो तहसीलदार यांना पाठवले मात्र शुन्य अहवाल दिला. मी त्या भागात गेलो तिथे नुकसान झाले होते मात्र काही अधिकारी नुकसान कागदावर का दाखवत नाहीत, त्यांनी मानसिकता बदलणे व मदत कशी मिळेल हे पाहावे असे ओमराजे म्हणाले.
प्रशासनाच्या अहवालानुसार 9 हजार हेक्टर जमीन खरडून गेली आहे, त्यातील 8 हजार 805 हेक्टर क्षेत्र खरडून तर 208 हेक्टर जमिनीवर गाळ साचलेला आहे. तुळजापूर तालुक्यात एकही गाव शेतकरी बाधित नसुन शून्य आकडेवारी दाखवली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची जमीन पुरामुळे खरवडून गेली आहे. या संदर्भात काही गैरसमज पसरवले जात आहेत. शेतकरी बांधवांनी काळजी करण्याचे कारण नाही. ज्या शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली आहे त्यांनी तातडीने पंचनामे करून घ्यावेत. शासनाकडून जमीन दुरुस्तीसाठी अनुदान उपलब्ध होणार आहे, तसेच रोजगार हमी योजनेतूनही मदत मिळणार आहे. याशिवाय तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि तेरणा ट्रस्टच्या वतीने देखील याबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले आहेत.