धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत व संपर्क प्रमुख राजन साळवी हे शिवसेना शिंदे गटाचे 3 नेते धाराशिव जिल्ह्यात येणार असुन या काळात पक्षाची रणनिती ठरणार आहे. सरनाईक, साळवी हे महायुतीसाठी आग्रही आहेत. सावंत यांनी सर्वासाठी चर्चेची दारे खुली ठेवत पत्ते उघड केले नाहीत.
सावंत यांना शह देण्यासाठी भाजपकडुन सर्व प्रयत्न केले जात असुन एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडुन पक्षश्रेष्टीचा दबाव तर दुसरीकडे पुतणे धनंजय सावंत यांच्या रूपाने ‘घरफोडी’ करून भाजप प्रवेशाची अशी दुहेरी व्युहरचना आखण्यात आली आहे तर सावंत यांचे काही शिलेदार फोडण्यासाठी इच्छुक उमेदवारांशी थेट संपर्क अभियान सुरु आहे. पक्षाची उमेदवारी व रसद देण्याचे आश्वासन दिले जात आहे. या घडामोडी व पार्श्वभूमीवर सावंत यांचा दौरा महत्वाचा आहे.
स्थानिक पदाधिकारी यांना बाजुला ठेवत शिवसेनेच्या काही नेत्यांनी भाजप नेत्या सोबत मुंबई येथे बोलणी करून अनेक बाबी निश्चित केल्या असुन त्याप्रमाणे अंमलबजावणी करणे बाकी आहे. धाराशिव नगर परिषद निवडणुकी प्रमाणेच पक्षाचे एबी फॉर्म हे शिवसेना संपर्क प्रमुख राजन साळवी यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा वाटप, फॉर्म व या सर्व प्रक्रियेत साळवी यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे.
आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत हे सोमवार 19 जानेवारी पासून 3 दिवसांच्या दौऱ्यावर असुन त्यांनी इच्छुक उमेदवार यांच्या मुलाखती व बैठका आयोजित केल्या आहेत तर पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व संपर्क प्रमुख राजन साळवी हे 20 जानेवारी रोजी मंगळवारी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. सोमवारी भाजप सेनेच्या काही नेत्यांची जागा वाटप बोलणी होणार असुन त्यानंतर बऱ्यापैकी चित्र उघड होईल अशी शक्यता आहे.
21 जानेवारी बुधवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतीम दिवस आहे तर 27 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. शिवसेना,भाजपसह अन्य पक्ष सर्व जागावर उमेदवारी अर्ज भरून नंतर महायुती व महाविकास आघाडीची चर्चा करणार की त्यापूर्वीच सगळं अंतीम करणार हे पाहावे लागेल. धाराशिव नप निवडणुकीत भाजपने उमेदवारीचे पत्ते शेवट पर्यंत उघड केले नव्हते, त्यामुळे शिवसेनेची मोठी नाचक्की झाली होती.
भुम व परंडा येथे शिवसेना अर्थात आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या विरोधात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह सगळे राजकीय पक्ष एकत्र आले. सावंत यांचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी काहींनी रसद देखील पुरवली. उमरगा येथे शिवसेना काँग्रेस एकत्र लढले, तिथे भाजपने विरोध केला. धाराशिव नगर परिषद निवडणुकीत चर्चेत गुंतवून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देऊ दिला नाही. या वेळी भाजप कोणती खेळी खेळणार हे पाहावे लागेल.












