धाराशिव – समय सारथी
राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यात शिवसेना पक्षात संघटनात्मक बदल करण्याचे संकेत दिले असुन आगामी काळात धाराशिव भगवामय करणार असल्याचा संकल्प त्यांनी पत्रकार परिषदेत बोलुन दाखविला. शिवसेना पक्ष संघटनेत जिल्हाप्रमुख पदाला सुरुवातीपासूनच विशेष महत्व असुन त्यातच पक्ष सत्तेत असल्याने शिवसेना जिल्हा प्रमुख पदावर काहींनी ‘डोळा’ ठेवत जोरदार लॉबिंग देखील सुरु केले तर विधानसभा उमेदवार प्रमाणेच शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष पण आपल्याच मर्जीतला असावा यासाठी भाजपच्या एका नेत्याने पेरणी सुद्धा केली आहे. प्रांतानुसार जिल्ह्यात सध्या 3 जिल्हा प्रमुख आहेत हे विशेष त्यामुळे सुसुत्रता व एकवाक्यता दिसली नाही. पालकमंत्री यांचा दौरा गटबाजी, लॉबिंग व बॅनरबाजीने चांगलाच गाजला. कोणी पालकमंत्री सरनाईक यांना खुश करण्यासाठी, कोणी जिल्हा नियोजन समितीच्या कामासाठी तर कोणी अस्तित्व दाखवीत पद मिळविण्यासाठी चढाओढ केली. अवघ्या काही महिन्यापुर्वी जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या माजी मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांना काही जणांनी बॅनर बाजूला सारत मर्यादित केले. सावंत हे पक्षाचे नेते आहेत त्यांचा मान व आदर करा असे म्हणत सरनाईक यांनी कान टोचले.
प्रजासत्ताक दिनानिमित्तचा सरनाईक यांचा पहिला धाराशिव दौरा शिवसेना पक्षासाठी महत्वाचा व सर्वसामान्य कार्यकर्त्यात उत्साह निर्माण करणारा ठरला. सरनाईक हे पहिल्यादा धाराशिव जिल्ह्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरबाजीतुन शिवसेना पक्षात गटातटाचे राजकारण व धाराशिव शहर बॅनरमय झाल्याचे सामान्य लोकांना पहायला मिळाले. एका गटाने बॅनरवर माजी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांना थेट डच्चू देत स्थान दिले नाही तर काहींनी बॅनरच्या क्षमतेप्रमाणे सावंत यांचे फोटो गरजे एवढेच मर्यादित ठेवले. एकंदरीत नवीन पालकमंत्री सरनाईक यांना खुश करताना एकेकाळच्या सावंतांच्या शिलेदारांनी त्यांना बॅनरवरून शिस्तीत बाजुला केले.
मी पालकमंत्री आहेच त्याबरोबर पक्षाचा प्रमुख पदाधिकारी आहे. गेली 30 वर्ष मी व एकनाथ शिंदे यांनी एकत्र काम केले आहे. आम्ही ठाणे महानगर पालिकेत दोघे एकत्र नगरसेवक होतो. संघटनात्मक पातळीवर भरपूर काही करण्याची व बदल करण्याची त्यांची इच्छा आहे. आम्हाला पुन्हा एकदा धाराशिव जिल्हा भगवामय करायचा आहे आणि बघायचा आहे. त्या माध्यमातून शिंदे यांनी माझी नेमणूक केली आहे आणि मी ते काम करणार असल्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सांगितले. जुन्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन धाराशिव जिल्हा कसा बळकट करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. मला पक्षही वाढवायचा आहे आणि माझ्या पक्षाने पालकमंत्री म्हणुन जबाबदारी माझ्यावर दिली आहे, तीही मी पुर्ण करणार आहे असे ते म्हणाले.
सावंत हे मुंबईतील शिवसेना मेळावा, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला व दौऱ्यात आले नाहीत त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा झाली. पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, काही कारणामुळे सावंत हे शिवसेना पक्षाच्या मेळाव्याला आले नसतील मात्र ते नाराज नाहीत. माझे नाव मंत्री पदासाठी येत होते पण मला संधी मिळाली नाही. राजकारणात प्रत्येकाला संधी मिळायला पाहिजे, सब्र का फल मिठा होता है असा सबुरीचा सल्ला त्यांनी सावंतांना दिला. आमच्या पक्षातील नाराजीचा विचार करू नका. ते नाराज नाहीत, त्यांचे शिवसेना व एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. तानाजी सावंत हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांचा आदर सन्मान सगळ्या शिवसैनिकांनी करणे गरजेचे आहे आणि तो करावा. सर्वसामान्य शिवसैनिक म्हणुन त्यांची ख्याती आहे, ते आजही काम करीत आहेत. गुवाहटी येथे 40 आमदार यांनी बंड केले त्यावेळी ते आग्रस्थानी होते, आम्ही त्यांना विश्वासात घेऊन धाराशिव जिल्ह्यात विकासाचे काम करू असे पालकमंत्री सरनाईक म्हणाले.
तानाजी सावंत यांनी माझ्यासमोर किंवा एकनाथ शिंदे यांच्यासमोर कधी नाराजी व्यक्त केली नाही. राजकीय खुर्ची असते, ती फेविकॉल घेऊन ती कोणाच्या खाली उभी राहत नाही. ती बदलत असते, आदलाबदल होत असते. मी सुद्धा गेल्या 20 वर्षांपासुन लोकप्रतिनिधी आहे, आमदार म्हणुन 2009 ला पहिल्यांदा निवडुन गेलो, माझीही बऱ्याच वर्षापासुन अपेक्षा होती की, मी मंत्री व्हावं परंतु मी नाराज झालो नाही. सावंत यांच्या शुभेच्छा नेहमीच माझ्या पाठीशी असतात, ते नेते आहेत. सावंत यांनी धाराशिव जिल्ह्याचे नेतृत्व केले आहे, पालकमंत्री म्हणुन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले आहे. त्यांच्या नाराजीची चिंता करू नका, आमच्या पक्षाचे नेते सक्षम आहेत, एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम आहे असे सरनाईक म्हणाले.