धाराशिव – समय सारथी
पक्ष तुमचा, उमेदवार आमचा असे म्हणत शिवसेना पक्षाच्या तिकीटावर भाजपा पदाधिकारी यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना भाजप महायुतीचे हे समीकरण समोर आले असुन शिवसेनेच्या चिन्हावर भाजप उमेदवार दिल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. पक्ष व मतदार संघ यांचा काहीही संबंध नसलेल्या लोकांना उमेदवारी दिली, पक्षातील काही नेत्यांनी शिवसेना विकली असा आरोप करीत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
धाराशिव तालुक्यातील पळसप जिल्हा परिषद गटात शिवसेना पक्षाकडुन भाजपचे नेताजी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाटील हे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सोबत ‘सावली’ सारखे असतात. त्यांना शिवसेनेतुन उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले. उतमी कायापुर येथील नेताजी पाटील हे पळसप गटातील नाहीत त्यांनी शिवसेनेत कधी प्रवेश घेतला, त्यांचा काय संबंध असे म्हणत शिवसेना तालुका प्रमुख अजित लाकाळ यांनी चार चौघात पाटील यांना खडेबोल सुनावत शाब्दिक उद्धार केला.
पक्षात प्रवेश न घेता उमेदवारीची माळ नेताजी पाटील यांच्या गळ्यात घातली तर जागा वाटपात बेंबळी गटाची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडून तिथे तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील महेंद्र धुरगुडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धुरगुडे यांना उमेदवारी देत त्यांचे पुनर्वसन केले व काही अटीवर राष्ट्रवादीला युतीत समाविष्ट करण्यात आले. नेताजी पाटील हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तरी धुरगुडे हे सदस्य राहिले आहेत.
लोकसभेला सुद्धा हाच पॅटर्न आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी राबवीत अर्चना ताई पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाकडुन उमेदवारी दिली त्यानंतर त्यांचा पराभव झाल्यावर त्या ‘स्वगृही’ सन्मानाने परतल्या. जिल्हा परिषदेत सुद्धा असेच होणार आहे, जे उमेदवार निवडून येतील त्यांना सत्ता आल्यास लाभाचे पद शिवसेनेच्या कोट्यातून देण्यात येईल. निवडुन न आलेले उमेदवार पुन्हा ‘स्वगृही’ घरवापसी करतील अशीच काहीशी रणनिती आहे.
अधिकांश ठिकाणी महायुती झाल्याचा दावा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केला आहे. आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी आरोप केल्या प्रमाणे पाटील हे 5 पक्ष खिशात ठेवतात. भाजप, धाराशिव कळंब व तुळजापूर या 3 तालुक्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट त्यांच्या राजकीय कौशल्याने चालवीत आहेत. याचा प्रत्यय अनेक वेळा आला आहे. त्यांची काही शिवसेना नेत्यांशी अतुट युती झाली आहे. पक्ष फोडा फोडी पेक्षा पक्षात माणसं पेरायची व पक्षचं सोईनुसार चालवण्याचा हा ‘राणा दादा’ पॅटर्न चांगलाच चर्चेला आला असुन मतदार, निष्ठावंत यांना गृहीत धरले गेले आहे.
तुळजापूर, कळंब व धाराशिव या 3 तालुक्यात शिवसेना शिंदे गटाला नेतृत्वरुपी वाली नसल्याने व शिवसेनेतील काही पदाधिकारी संपर्कात असल्याने आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा हस्तक्षेप दिसुन येतो. संपर्क प्रमुख राजन साळवी यांच्या माध्यमातून इच्छित गोष्टी साध्य होत आहेत. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांची भुमिका काय असणार हे धाराशिव दौऱ्यावर आल्यावर कळणार आहे.












