धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद तिकीट वाटपावरून शिवसेना पक्षात घमासान सुरु असुन सेनेच्या जागेवर भाजप उमेदवाराला तिकीट दिल्यावरून शिवसैनिक संतप्त झाले आहेत. शिवसेना पक्षाचे एबी फॉर्म अजित पिंगळे यांच्याकडे दिले होते त्यांनी ते चुकीच्या पद्धतीने वाटप केले असे पालकमंत्री सरनाईक व संपर्क प्रमुख राजन साळवी म्हणाले.
शिवसेनेचे एबी फॉर्म आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडे होते त्यांनी ते भाजपच्या पदाधिकारी यांना दिले, पिंगळे हे त्यांचे आहेत असा आरोप शिवसैनिक यांनी केला होता मात्र सरनाईक व साळवी यांनी ते फॉर्म पिंगळे यांच्याकडे होते असे म्हणत त्यांच्यावर खापर फोडले. पिंगळे यांचा त्यात ‘हातभार’ असेल मात्र खरचं त्यांना इतके पुर्ण अधिकार होते का ? असाही सवाल होत आहे.
एबी फॉर्म अजित पिंगळे यांच्या हातात विश्वास ठेवून दिले मात्र त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्याचे वाटप केले. त्यांनी शिवसैनिक यांना विश्वासात न घेता ते दिले हे योग्य नाही मी त्यांना बोलणार आहे. पिंगळे यांना सांगितले होते की इतक्या जागा आपल्याला सुटल्या आहेत, तुम्ही व जिल्हा प्रमुख एकत्र बसून एबी फॉर्म द्यायला पाहिजे मात्र तसे झाले नाही. एका गटाला न्याय दिला व दुसऱ्या गटाला न्याय दिला नाही असा शिवसैनिक यांचा आरोप आहे मात्र तसे नसुन शिवसेना अखंड आहे असा दावा सरनाईक यांनी केला.
आमदार तानाजीराव सावंत हे शिवसेनेचे आमदार असुन ते महायुतीचे घटक आहेत. भुम परंडा येथे त्यांनी ताकत दाखवून शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आणले याचा अर्थ भाजप पेक्षा शिवसेनेची ताकत जास्त आहे हे त्यांनी दाखवून दिले. धनंजय सावंत व तानाजी सावंत यांचा तो घरचा वयक्तिक वाद आहे तो त्यांनी सोडवावा. कौटुंबिक वादाचा फायदा पक्षाला घेणाऱ्या पैकी मी नाही असे म्हणत त्यांनी शिवसेना त्यात सहभागी होणार नाही असे म्हणत सरनाईक यांनी भुमिका स्पष्ट केली.
विधानसभा निवडणुकीत धाराशिव कळंब येथे शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले त्यामुळे शिवसैनिक यांचे खच्चीकरण झाले मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीनंतर ताकत वाढेल व पून्हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनेल, असा विश्वास व्यक्त केला. एबी फॉर्म दिला की तो शिवसेनेचा असतो, जाण्याचे दरवाजे बंद झालेले असतात. भाजप, राष्ट्रवादी कोणत्याही पक्षातून तो आला व त्याला फॉर्म मिळाला की तो शिवसेनेचा असे पालकमंत्री म्हणाले. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील.
पक्षीय पातळीवर संघटनात्मक बदलाची चर्चा सुरु असुन त्यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले की, तूर्तास तसे काही नाही मात्र 7 तारखेला योग्य प्रकारे चांगला निकाल आला तर बदल होणार नाहीत मात्र नगर परिषदेप्रमाणे निकाल आले तर काही बदल करावे लागतील असे म्हणत त्यांनी एक प्रकारे इशारा दिला.












