धाराशिव – समय सारथी
‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’ चे नामकरण करण्यात आले असुन आता ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’ असे अधिकृत नाव असणार आहे. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी मागील आठवड्यात रेल्वे अधिकारी यांची बैठक घेऊन नामकरणसह अन्य मुद्यावर चर्चा केली होती. अखेर त्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव झाले असले तरी रेल्वे स्थानकाचे नाव उस्मानाबाद वापरले जात होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने नाहरकत दिल्यानंतर राज्य सरकारने नाव बदलाबाबत राजपत्र अधिसूचना काढली. केंद्रीय गृहमंत्रालयाने 16 एप्रिल रोजी नाहरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने याबाबत 25 एप्रिल रोजी अधिसुचना काढली होती. नावातील स्पेलिंग व इतर बाबी तपासून 21 मे रोजी धाराशिव नावाची अधिसूचना काढण्यात आली त्यामुळे रेल्वे स्थानकावर धाराशिव बोर्ड लावण्यात येणार आहे.
उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचं नाव आता अधिकृतपणे ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’ झाले आहे, हा केवळ एक बदल नाही, तर आमच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा विजय आहे अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली. गृह मंत्रालयाच्या 2 डिसेंबर 2024 च्या पत्रानुसार, या नाव बदलाच्या प्रस्तावावर भारतीय सर्वेक्षण विभागाची टिप्पणी मागवण्यात आली होती. यानंतर देखील उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे धाराशिव असे नामांतर करण्याबाबत संथ गतीने प्रक्रिया सुरू होती.
खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी सह बैठक घेऊन सदर स्थानकाचे नाव धाराशिव असे नामांतरित करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करणे बाबत सूचित केले होते तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून पत्राव्दारे पाठपुरावा केला होता. त्यानुसार केंद्र शासनाने उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नामांतर धाराशिव असे करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे धाराशिव या प्राचीन ऐतिहासिक शहराला पारंपरिक ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, स्थानिक नागरिकांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत आहे.