धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरात जिजाऊ चौक ते भवानी चौक या रस्त्याचे अतिक्रमण काढताना सार्वजनिक बांधकाम विभागाने दुजाभाव केल्याचा आरोप होत आहे. धनदांडग्या लोकांकडे दुर्लक्ष करून ‘अभय’ तर गोरगरीब लोकांचे अतिक्रमण सक्तीने काढून ‘कर्तव्य’ केले. काही जणांना खास न्याय तर काही जणांवर अन्याय अश्यामुळे आरोप होत आहेत. बांधकाम विभागाकडे या रस्त्याबाबत पूर्वीचे कागदपत्रे नाहीत असाही आरोप होत असल्याने सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे.
महामार्ग 68 वरील पाटस -दौड- धाराशिव-बोरफळ मार्गावरील जिजाऊ चौक ते भवानी चौक हा मार्ग नवीन प्रकल्पाच्या अंतर्गत 24 मीटर रुंदीचा रस्ता करण्यासाठी योजना सुरु असल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. 12 ऑगस्ट व 13 ऑगस्ट असे 2 दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबवली मात्र काही जणांची अतिक्रमण जैसे थे आहेत. ज्यांना कायद्याचा धाक आहे त्यांनी काढून घेतले मात्र काही जन ठाम आहेत.
तोंड पाहून काम, दबाव तंत्र वापरून हे सुरु आहे. ज्यांची अतिक्रमण कायम आहे त्यांना 12 सप्टेंबर रोजी नोटीस काढून ते काढण्याचे पत्र दिले आहे मात्र त्यात कधीपर्यंत काढावे यांची वेळ नमूद नसल्याने सगळे जन निवांत आहे. बांधकाम विभागाने पत्र काढून कागदोपत्री ‘सोपस्कार’ पुर्ण केले आहेत तर तारीख नमूद नसल्याने आम्हाला ‘अमर्याद’ वेळ आहे असे अतिक्रमणधारक सांगतात. कोणाचे व किती अतिक्रमण आहे व ज्यांना नोटीसा दिल्या आहेत याची यादी बांधकाम विभागाकडून सार्वजनिकरित्या जाहीर होणे अपेक्षित आहे.
रस्त्यांचे रुंदीकरण होऊन वाहतूक व्यवस्था अधिक सुटसुटीत व सुरक्षित होईल, यासाठी हे काम सुरु आहे मात्र काही ठिकाणी दुटप्पी भुमिका अडथळा ठरत आहे. काही ठिकाणी 9 तर काही ठिकाणी 12 मीटर त्यामुळे रस्ता झिग झ्याग नागमोडी वळणे घेतो की काय असे दिसते. सगळीकडे समसमान रुंदी नसल्याने, ठोस कागदपत्रे नसल्याने काही जन कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.
अतिक्रमण हटाव मोहीम काही जणासाठी अतिक्रमण बचाब मोहीम बनली असुन बांधकाम विभागाच्या अधिकारी यांच्यावर दबाव आणला जात आहे. समसमान न्याय मिळावा व लवकर काम व्हावे अशी सामान्य धाराशिवकर यांची अपेक्षा आहे.