उमरगा – समय सारथी
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांच्या पथकाने उमरगा तालुक्यात कवठा शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून तिरट खेळणाऱ्या 13 जणांना अटक केली. या कारवाईत एकूण 17 लाख 58 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ही कारवाई केली.
कवठा येथील लातूर रोडलगत असलेल्या दयानंद सोनवणे यांच्या शेतातील गोठ्यामध्ये काही जण तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर छापा टाकण्यात आला. या कारवाईत 13 जणांना अटक करण्यात आली त्यात शाम काळे, समीर शेख, आकाश कदम, महेश काळे, किशोर ननुरे, कैलास पुजारी, गोपाळ पंजारी, हबीब सय्यद, दत्ता चव्हाण, जितेंद्र काळे, विवेकानंद सोनवणे, सचिन गायकवाड (सर्व रा. उमरगा, औसा व लातूर परिसर यांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 3 कार, 9 मोबाईल फोन, तिरट साहित्य व 13 हजार 900 रु. रोख रक्कम असा एकूण 17 लाख 59 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधितांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4 व 5 अंतर्गत उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.