धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषद अंतर्गत कोट्यावधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी विशेष लेखापरीक्षण 27 ऑक्टोबर पासुन गेली 2 महिन्यापासुन रखडले आहे. नगर परिषद निकाल लागला तरी संचिका व इतर कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने छत्रपती संभाजी नगर विभागाचे स्थानिक निधी लेखापरीक्षा सहायक संचालक कुसुम चव्हाण राठोड यांनी पुन्हा एकदा मुख्याधिकारी यांना लेखी पत्र काढत संचिका मागवल्या आहेत.
संचिका व कागदपत्रे गहाळ असल्याची सूत्रांची माहिती असुन काही संचिका पुन्हा नव्याने तयार करण्याची व्युव्हरचना आखली आखली जात आहे त्यामुळे काही संचिका नव्याने अवतरु शकतात. प्रशासक राज संपुन नगराध्यक्षपदी नेहा राहुल काकडे यांची निवड होऊन त्यांनी पदभार घेतल्याने आता तरी हा विषय मार्गी लागून यातील भ्रष्टाचाराचे व अनियमिततेचे सत्य समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम 4 नोव्हेंबर पासुन जाहिर झाला असल्याने नगर परीषद कार्यालयातील कर्मचारी यांना निवडणुकीचे विविध जबाबदारीचे कामे सोपविण्यात आलेली आहेत. नगर परीषदेचे कर्मचारी हे सध्या निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असल्याचे कारण मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दिले होते. त्यानंतर पुन्हा लेखा परीक्षण विभागाने पत्र काढले आहे. सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम पुर्ण झालेला असल्यामुळे विशेष लेखापरीक्षणास तात्काळ अभिलेखे उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी जेणे करुन लेखापरीक्षणाचे श्रमदिन वाया जाणार नाही व विशेष लेखापरीक्षण विहित कालावधीत पुर्ण करता येईल.
आमदार सुरेश धस यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांच्या मागणीनुसार लेखापरीक्षण होत आहे. तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे व वसुधा फड यांच्या कार्यकाळातील लेखापरीक्षण होत आहे. संचिका उपलब्ध कराव्यात यासाठी वारंवार पत्र व्यवहार सुरु आहे तर संचिका शोधासाठी धावपळ सुरु आहे. या प्रकरणात वेळकाढुपणा व चालढकल केली जात आहे.
लेखा परीक्षणाचे काम योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या लेख्यांच्या संबंधातील सर्व प्रमाणके, किर्द, धनादेश, संचिका, आवश्यक नोंदवह्या, मोजमाप पुस्तीका, विवरणपत्रे, पत्रव्यवहार, टिपण्या किंवा इतर संबंधित सर्व दस्तऐवज विहीत वेळेत उपलब्ध करुन देण्यात यावे असे पत्रात आहे. लेखापरीक्षकांनी दिलेल्या अर्धसमास पत्रामध्ये नमुद केलेल्या हरकती ताबडतोब निकाली काढाव्यात असे म्हण्टले आहे.
आमदार सुरेश धस यांनी धाराशिव नगरपरिषदेचे जुलै 2020 ते 23 डिसेंबर 2022 या काळातील विशेष लेखापरीक्षण करावे अशी मागणी केली होती त्यानुसार हे करण्यात येणार आहे. स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहसंचालक दीपाराणी देवतराज यांनी स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहायक संचालक यांना तसे दिले आहेत. 7 अधिकारी यांचे पथक विशेष लेखा परीक्षण करणार असुन त्यात नांदेड, सोलापूर, जालना जिल्ह्यातील अधिकारी यांचा समावेश आहे.
2020 ते 2022 या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार धस यांनी केला होता. तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे व वसुधा फड यांच्या कार्यकाळातील परीक्षण होणार आहे. यलगट्टे यांच्यावर गुन्हे नोंद होऊन त्यांना काही महिने जेलमध्ये राहवे लागले त्यानंतर त्यांचे निलंबन झाले तर फड यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली.
विशेष लेखापरीक्षणासाठी ज्ञानेश्वर सुळ, सहायक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, धाराशिव हे पथक प्रमुख राहतील. डी आर शिनगारे, सहायक लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधी लेखापरीक्षा, नांदेड, बा भा भारती, वरिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, सोलापुर, बी एस मलाव, वरिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, सोलापुर, सुदाम वाघमारे, कनिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, नांदेड, आकाश वर्मा, कनिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, जालना व सुशिल कुलकर्णी, कनिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, जालना अश्या 7 जणांचा समावेश आहे.










