धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषद अंतर्गत कोट्यावधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी विशेष लेखापरीक्षण 27 ऑक्टोबर पासुन गेली 2 महिन्यापासुन रखडले आहे. कोरोना काळात केलेल्या अनेक कामांसह बांधकाम इतर संचिकाचा यात समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे. कोरोना काळात ‘अप्पती’च्या नावाखाली अनेक कामे करून अधिकारी व संबंधितानी ‘संपत्ती’ कमावली. बांधकामच्या अनेक कामांच्या संचिका सापडत नसल्याने अधिकारी हतबल झाले आहेत तर विशेष लेखा परीक्षण पथक पत्रावर पत्र पाठवीत आहे.
मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार तत्कालीन पोलिस महासंचालक यांनी एसआयटी स्थापना केले. यात नियंत्रण व देखरेखीसाठी नोडल अधिकारी व विशेष तपास पथक अधिकारी नेमण्यात आले असुन चौकशी सुरु आहे. बायोमायनिंग प्रकल्प तत्कालीन मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे,नगर अभियंता नवनाथ केंद्रे यांच्या काळात राबविण्यात आला. कचऱ्यापासून खत निर्मिती न करता करोडो रुपयांचे बिल ठेकेदार यांना देण्यात आले आहे, हेही प्रकरण प्रलंबित असुन थर्ड पार्टी ऑडिट रखडले आहे.
27 कोटी 34 लाख रुपयांच्या विकास कामाच्या बिलात अपहार झाल्याचा आरोप असुन प्रमाणके गहाळ प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपहार, फसवणूक, पुरावा नष्ट करणेसह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 चे कलम 9 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार 1 हजार 88 प्रमाणके गायब होती त्यात शासकीय देयके, विद्युत देयके, शासकीय कर, लाभार्थी, वेतन मानधन व इतर कर असे शासकीय खर्च केलेले 574 देयके आणि ठेकेदार, विकास योजना व किरकोळ खर्चाची 514 देयके अशी वर्गवारी करून अहवाल सादर करण्यात आला होता. अनेक विकास कामे निकृष्ट आहेत त्यामुळे कर्मचारी व ठेकेदार रडारवर आहेत.
नगर परिषद निवडणुकीचे कारण पुढे करण्यात आले होते मात्र निकाल लागला तरी संचिका व इतर कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने छत्रपती संभाजी नगर विभागाचे स्थानिक निधी लेखापरीक्षा सहायक संचालक कुसुम चव्हाण राठोड यांनी पुन्हा एकदा मुख्याधिकारी यांना लेखी पत्र काढत संचिका मागवल्या आहेत. लेखापरीक्षणाचे श्रमदिन वाया जाणार नाही व विशेष लेखापरीक्षण विहित कालावधीत पुर्ण करता येईल.
लेखा परीक्षणाचे काम योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या लेख्यांच्या संबंधातील सर्व प्रमाणके, किर्द, धनादेश, संचिका, आवश्यक नोंदवह्या, मोजमाप पुस्तीका, विवरणपत्रे, पत्रव्यवहार, टिपण्या किंवा इतर संबंधित सर्व दस्तऐवज विहीत वेळेत उपलब्ध करुन देण्यात यावे असे पत्रात आहे. लेखापरीक्षकांनी दिलेल्या अर्धसमास पत्रामध्ये नमुद केलेल्या हरकती ताबडतोब निकाली काढाव्यात असे म्हण्टले आहे.
आमदार सुरेश धस यांनी धाराशिव नगरपरिषदेचे जुलै 2020 ते 23 डिसेंबर 2022 या काळातील विशेष लेखापरीक्षण करावे अशी मागणी केली होती त्यानुसार तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे व वसुधा फड यांच्या कार्यकाळातील लेखापरीक्षण होत आहे. स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहसंचालक दीपाराणी देवतराज यांनी स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहायक संचालक यांना तसे दिले आहेत. 7 अधिकारी यांचे पथक विशेष लेखा परीक्षण करणार असुन त्यात नांदेड, सोलापूर, जालना जिल्ह्यातील अधिकारी यांचा समावेश आहे.
विशेष लेखापरीक्षणासाठी ज्ञानेश्वर सुळ, सहायक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, धाराशिव हे पथक प्रमुख राहतील. डी आर शिनगारे, सहायक लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधी लेखापरीक्षा, नांदेड, बा भा भारती, वरिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, सोलापुर, बी एस मलाव, वरिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, सोलापुर, सुदाम वाघमारे, कनिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, नांदेड, आकाश वर्मा, कनिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, जालना व सुशिल कुलकर्णी, कनिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, जालना अश्या 7 जणांचा समावेश आहे.












